Wednesday, April 18, 2012

"मुक्त"

रंगवणारा तो,
कुठलीही रंग"संगती" घडवतो.

हे रंग एकमेकांना भेटल्यावर,
स्वतःचे अस्तित्व बदलून
"स्व" संपूर्ण नष्ट होऊन
तयार होतो नवा "रंग"

वदतो तो बरंच काही...
पण सारकाही मौनात व्यक्त,
उरतात मागे,
काही आलेख...
काही खुणा...
आणि काही अवशेष फक्त....
ह्याच निःशब्दाची सीमा ओलांडून,
सुनसान वस्तीत वसलेल्या...
आवाजाचे पृथ्थकरण झाल्यावर,
उरतो एक वेगळाच "मंत्र"

त्याच्या ह्या अफाट संसारातलं,
माझ हे इवलंस अस्तित्व,
त्याने निर्मिलेल्या,
"त्या"वेगळ्या "रंगा"त,
रंगू पहातंय...
त्याने निर्मिलेला तो "मंत्र "
एकदा उच्चारून,
मुक्त होऊ पहातंय....
"माझं"
हे अस्तित्व
जे त्याचाच एक अंश आहे...

..सई

Sunday, April 8, 2012

"सावल्या"



धूसर होत चाललेल्या,
काही ओळखीच्या
काही अनोळखी...

कधी तृप्त
कधी अधाशी...

"सावल्या"

सांजेच्या कुशीतून
रातीच्या डोहात
शिरताना,
त्याही गुडूप झाल्या...
:
काळ्या कुट्ट
अंधाराच्या मिठीत
विरघळलंय आता अस्तित्व
:
पण त्या सावल्यांच्या
करड्या छटा...
त्यांच काय...?

ज्यांचा मन अजूनही घेतंय...
मागोवा...

...सई

Thursday, March 29, 2012

"एक प्रवास"

एक प्रवास
कधी बेफाम,उन्मत्त
हत्तीसारखा..

तर कधी,
आपल्याच कोशात गुरफटलेल्या
सुरवंटासारखा...

असा प्रवास ज्यात
नसतात सोबतीला
नकाशे दिशांचे
तरीही पावले
चालतच राहतात
घेत राहतात
वाऱ्यासोबत
आढावे त्याच दिशेचे
अनुमान घेते मन
अनवट वाटेचे
शून्यातून मार्ग काढताना
कधी कधी गोठते पायवाट....
मनाच्या पटलावर
कंप येतात भीतीचे
विळखा होतो वाऱ्याचा
आभाळही वाटत फाटल्यासारख
ओशाळून जातो जीव
काही पांथस्थ येतात सोबतीला
निघूनही जातात आल्यासारखे
तरी प्रवास थांबत नाही.

कारण ,
तो प्रवासच  असतो एकाकी
अंतरीचा स्वर परफेक्ट शोधण्याचा
विखुरलेल्या,
गोठलेल्या,
कंपलेल्या,
साऱ्या तारा छेडून,
"स्व" शोधण्याचा...

...सई

Thursday, March 15, 2012

"अनुबंध"

मनाच्या आकाशात
हसर चांदणं..
आसवात वाहत
नकोस दुखणं.
कितीही दुरावलो तरी
मनातली सय कायम
कित्येक हूळहूळणारे पाश
घेऊन रुजलेलं...
कित्येक नकोसे शाप
लागूनही तरलेलं...
भिनलोय जणू
एकमेकांच्या रंध्रात....
रक्त होऊन....
मनाच्या कॅनव्हास वर
उमटले आहेत प्रेमभाव
असे,
जसे,रंग उमटावेत..
कोऱ्या कागदावर
अन एक सुंदर चित्र घडावं 
शब्दांच्या पलीकडलं
हे नातं,
काहीस मोकळं
काहीस बेबंद....
जणू श्वासांनी
एकमेकांशी केलेला
एका गोड बंधनाचा
"अनुबंध"

....सई

Tuesday, February 28, 2012

"अफाट"

इतक्या  आभाळाखाली
खेळ मांडायचा...म्हणजे...
कठीण आहे खंर...
पण,
मला जमलं...
तुझ्यासोबत...
तुझ्या कुशीत झेपावलं की, 
किती निर्धास्त होते मी
साऱ्या जगापासून वेगळी
ह्या आकाशाशी असलेलं
नातही विसरते...
एकंच नात अस्तित्वात उरत...
तुझ्या-माझ्या प्रेमाचं....

..सई

Monday, February 27, 2012

"स्वप्न"

जुळतात स्वप्न
केवळ हा भास
बंधनाच्या बेड्या
तोडतात श्वास....

इवलं ते स्वप्न
उरात वसते 
क्षण क्षण मन
स्वप्नच  गुंफते....

चालते एकटी
स्वप्नांची वाट
सरणाहूनही 
बिकट पायवाट....

कण कण असे 
तुटणारे स्वप्न
ठीकऱ्या  होऊन
विखुरले मन....

विखुरत्या मना
आकाशाची ओढ
चांदण ओंजळ
स्वप्नांची जोड....

स्वप्नांना का मन
देते पुन्हा हाक
त्यांनाही आहेच
प्रकाशाचा धाक....

...सई 

Wednesday, February 8, 2012

"माहेर"

मन आले हे भरुन,
माहेराच्या आठवाने..
मायेच्या कुशीसाठी,
असे सैरभैर झाले..

माहेरच्या उबेसाठी,
मन वेडे आसुसते..
सय माहेराची अशी,
घट्ट दाटुनिया येते..

भेटीसाठी माहेराच्या,
जीव माझा व्याकुळतो..
माहेराच्या ओढीने,
डोळा आसू दाटवते...

माय असा लावे जीव,
जशी आभाळाची माया..
बापाच्या धाकातही,
असे वडा-पिंपळाची छाया..

आठवाने  माहेराच्या,
दाटतो मनात गहीवर...
गावी जाता माहेराच्या,
मनी फुलतो मोहोर...

सासरी माझ्या माये,
सुख  रिंगण घालते..
तरी माहेरच्या सुखला,
मनाचे अंगण तरसते..

...सई