Wednesday, December 17, 2008

आत्मविश्वाचे थवे...

कोंडलेल्या भावनांना
तु वाट नवी दे..
अंधारमय आयुष्याला
आशेची पहाट नवी दे...

स्वतःच्या हाताने
तु नशीब घडव.
हातावरच्या रेषा आता
धेयाच्या दिशेने वळव...

मुक्त मुक्त श्वासातुन
गा तु गीत नवे ...
तुझ्या स्वरातुन सदा
येवो आत्मविश्वाचे थवे...

...सई(सुप्रिया पाटील)

सोनेरी स्पर्श

तुझ्या मिठित येता
विसरते माझे भान
जसे पावसात भिजते
चिंब-चिंब पान पान...

तुझ्या रंगात रंगता
सांग सावरावे कसे
स्पर्श तुझा होता
भाव आवरती कसे...?

अणु-रेणु या तनाचा
स्पर्शाने शहारला...
तुझा सोनेरी स्पर्श
रोमारोमात भिनला..

...सई(सुप्रिया पाटील)

खुळं..

आठवांच्या झुल्यांवर
हिंदोळा घेतो
आपणही खुळे
प्रेमात या होतो...!

चंद्र-तार्यांना
शब्दात उतरवतो
जागुन त्यांच्यासोबत
कविता रचतो...!

आपल्याच विश्वात
खुळ्यागत रमतो
प्रेमालाही आपण
खुळं बनवतो..!

...सई(सुप्रिया पाटील)

बोल ना..!

तुझ्या आसवांत सये
शब्द वाहु का गं देते
गीत मनात दाटवुनी
अशी भाव लपवते..!

माझ्या शब्दातं गं तु्ला
जशी ऊब मिळे प्रेमाची
तशी मलाही हवी राणी
उबदार कुस तुझ्या शब्दांची...!

येऊ दे ना गं सये
बहार तुझ्या शब्दांचा
नको राहूस अबोल
आता तरी बोल ना..!

आता तरी बोल ना..!

.....सई(सुप्रिया पाटील)

"इंतजार"

माझ्या मनाची आता
हीच गत आहे...
तुला आठवण म्हणजे
माझ्यासाठी व्रत आहे...

सारखं मन वाहवत जात
तुझ्या आठवांच्या देशी..
कितीही थांबवावं म्हटलं
तरी थांबत नाही मजपाशी....

आता हा विरह हा
नकोसा झालाय मलाही...
भेटण्यासाठीचा "इंतजार"
करवत नाहीये ना तुलाही???

माझ्या मनाचा रस्ता अरे,
कधीच तुझ्या दिलाच्या दिशेने वळलायं..
मलाही आता,
तुझा "इंतजार" चांगलाच कळलायं...

....सई(सुप्रिया पाटील)

Tuesday, December 2, 2008

स्वप्न..

आपल्या स्वप्नांना
वाट मिळालीच नाही.....
विरहाच्या या रातीची
पहाट कधी झालीच नाही....
आजही लाटच आहे मी...
फ़रक इतकाच.....
पुर्वी येऊन भेटायचे तुला...
अन आता किनाराच
वेगळा लाभलाय मला....
पण अजुनही तुच आठवतोस...
कुठतरी खोलवर वादळ होऊन धुमसतोस....
पौर्णिमेचा चंद्र पाहताना...
रातराणी धुंद बहरताना...
वळवाच्या पावसात भिजताना....
अजुनही तुझी आठवण येतेच....
तुही अजुन विसरला नाहीस ना मला..?
माहीतेय....त्याच क्षणात अडकलायसं....
बांधुन ठेवल्यासारखा.....की बांधुन घेतल्यासारखा..?

....सई

हुंकार

प्रत्येक वेळी तु दिसलास की,
मनातलं वादळ अजुन जोरात उठतं...
कुठतरी थोडी शांत झालेल्या मला
पुन्हा उद्धवस्त करुन सोडतं.....
खुप वाट पाहीली होती तुझी....
तु दुरदेशी जाताना विचारलही होतं...
"माझ्यासाठी परत माझाच होण्यासाठी येशील ना?"
तेव्हाही फ़क्त "हुं" असच केल होतस...
मी त्यावरही विश्वास ठेवला होता....
वाट बघत बसले तुझी....पण...
तु आलास तेही लग्न करुन....
सहचारीणी सोबत....मला विसरुन...
इतके मोठे प्रश्न निर्माण झाले होते का रे?
इतकी वादळं आली होती का?
की ज्यासमोर माझा जराही विचार आला नाही मनात...
घरच्यांचा निर्णयही हुंकारावरच निभावुन नेला असशील ना?
पण तुझ्या त्या शांततेमुळे माझ्यावर आलेल्या वादळाचं काय??

...सई(सुप्रिया पाटील)

Monday, November 24, 2008

"अखेरचे गीत"

"प्रेमभावना"

दाटी आभाळ तसेच
पण नसे तुझी साथ
वाटे खोली ही परकी
वाटे परकेच अंगण...!

माझ्या भाळी दुसर्‍याचे
आता कुंकु रे वसते
मनी तुझीच परि मी
प्रेमभावना रे जपते...!

येता पाऊस वळवाचा
तुझी याद सख्या येते
त्याच्या प्रत्येक थेंबात
मज तुझा स्पर्श देते...!

येता सांजवेळ सख्या
मन व्याकुळ रे होई
वाट पाही तुझ्या येण्याची
पण कुंकुवाचा धनी येई...!

....सई

Thursday, November 20, 2008

"भुतकाळाचे काजळ"

माझ्या डोळ्यात सदा
असे तुझाच दरवळ...
जणू ल्यायले मी,
भुतकाळाचे काजळ...!

मनातही सारखा
असे तुझाच चेहरा...
तुझा आठवांचा जणु
मजवर आहे पहारा...!

कसा रे हा आपुल्य़ा
प्रेमाचा हा असा डोह...
दुर सारलो गेलो तरी
देई वेदना नेहमी दाह..!

...सई

"पाऊसवेडी"

ऋतु आला पावसाळी
सार्‍या मातीला सुगंध
मनी आठवांच्या तुझ्या
सख्या येतो रे गंध...!

आठवे भेट आपुली
होता पावसाचा जोर
चिंब झालेल्या मला
तुझ्या मिठीचा आधार...!

तुझ्या प्रेमाच्या सरीत
माझा अणु-रेणु भिजलेला
तेव्हा पाऊसही कसा
खट्याळ होऊन बरसलेला...!

ओसरता पाऊस जसा
येई निसर्गात गारवा
माझ्या मनातही सख्या
तुझ्या आठवांचा पारवा...!

आला पाऊस की मी
होते रे "पाऊसवेडी"
जशी तुझिया प्रेमात
आहे मी रे "प्रेमवेडी"...!

....सई

प्रेमाचा सोहळा..

आकाशाच्या कुशीत
चांदणं अलगद निजेल
तुझ्या कुशीत येऊन
प्रेमात मी चिंब भिजेन...!

गारठलेल्या पहाटेत हवी
ऊब तुझ्या मिठीची
तुझ्या बेभान स्पर्शात
न उरेन मी माझी...!

स्वप्नातल सारच कस
सत्यात उतरलेलं असेल
तुझ्या माझ्या प्रेमाला
पारिजातकाची साथ असेल...!

रंगुन रंगात तुझिया
होई रंग माझा वेगळा
सकाळही करेल साजरा
आपल्या प्रेमाचा सोहळा...!

.....सई

Wednesday, September 17, 2008

चिठ्ठी ना कोई संदेस...

रविवार असल्यामुळे जरासं 'चेंज' म्हणून सगळेचजण आज झोपेतुन लेट उठलो होतो. दररोज ११ वाजेपर्यंत आपापल्या कामांमध्ये मशगूल होणारे आम्ही अजुन मात्र निवांतपणे चहा नाश्ता एँन्जाय करत होतो. जरा वेळाने मम्मीने स्वयंपाकाला सुरुवात केली पण मी आळशी त्यामुळे तिला मदत न करता ऑर्कुटींग करत बसले..आज हक्काचा दिवस आहे असं समजून.

१-२ तास मजेत ऑर्कुटींग झाल्यावर जेवायला गेले. इतक्यात पप्पांचे मित्र सरतापे यांचा फ़ोन आला. पप्पा जेवत होते. सो.. फ़ोन मी उचलला. "पप्पाना फ़ोन दे" इतकचं बोलले सरतापे. त्यांच्या आवाजात कसलसं टेंशन जाणवत होत. मी पप्पांना फ़ोन दिला. "अरे मी या शिवम हॉस्पिटलमधे आहे. शिंदेच्या मुलीला डॉक्टर अँडमिट करायचं म्हणतायत. तु जरा ये. तो घाबरल्यासारखा वाटतोय" असं काहिसं म्हणाले ते.
घाबरणारच ना! कुठलाही पुरुष जेव्हा बाप होतो, तोही मुलीचा तेव्हा तो पुरुष असला तरी हळवा बनतो आणि काळजी करतो, ती एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त भावनाप्रधान होऊन. पप्पांनी लगेच हात धुतला आणि तयारी करुन निघाले. मम्मीही गेली पप्पांसोबत.

शिंदेकाका हे आमचे फ़ँमिली फ़्रेंड होते. त्यांची मुलगी, स्नेहा ९ वी मधे शिकायला होती. त्यामुळे आम्हालाही तसं टेंशनच आलं होतं.आणि का कोण जाणे माझ्या मनाला विचित्र भिती वाटली.

थोड्या वेळाने मीही जाणारच होते. घाईघाईने घरातली कामं आटोपत होते तोच पप्पांचा फ़ोन आला, स्नेहा गेली म्हणुन.माझ्या मनाची भिती खरी ठरली. रडु आवरेनासंच झालं. ती एवढुशी स्नेहा डोळ्यासमोर आली. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळ्या आठवणी आठवल्या.काल-परवा डोळ्यासमोर असणारी व्यक्ती अशी अचानक गेली यावर विश्वासच बसेना.आणि हुंदकेही आवरेना.

कसं ना माणसाचं काहीच सांगता येत नाही कधी काय होईल ते. फ़क्त उलटी आणि तापाचं निमित्त झालं आणि स्नेहा हे जग कायमच सोडून गेली.

कुणी वारलं ओळखीतलं किंवा अनोळखी जरी...म्हणजे मरणाची बातमी मग ती कुणाचीही असो कशीही कानावर आली तरी का कुणास ठावुक लगेच माझ्या मनात विचार येतो की उद्या मीही अशीच चालता बोलता निघून गेले तर? कधी ना कधी मी मरणार तर आहेच. पण तरीही असा विचार येतो आणि खुप वेळ मी हाच विचार करत बसते.

मी मेले तर सगळ्यात जास्त कोण रडेल?
कोणाला सगळ्यात जास्त वाईट वाटेल?

तसं कुणाचं फ़ार काही अडेल असं नाहीये. पण तरीही माणसाचं मनंच असं, 'आपल्यावाचुन कुणाचं काहीच अडत नाही' हा विचारही किती त्रास देतो नाही का? माझंही तसंच. मीही एक सर्वसामान्यचं आहे ना.
आज तसंच काहीसं झालं.

"चिठ्ठी ना कोई संदेस...
जाने वो कोनसा देस,
जहाँ तुम चले गये..."

हे जगजीतचं गाणं ऎकताना विचार भरकटायला लागले. आधी फ़क्त एक गाणं म्हणुन ऎकल आणि मग जेव्हा मन लावुन ऎकल तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द घुसत गेला मनात.

न राहवुन मी सख्याला विचारलं 'तु हे गाणं ऎकलयसं का?' तर तो म्हणाला की 'हे गाणं तर मला पाठ आहे' आणि त्याने चक्क गायला सुरुवात केली. तसा त्याचा आवाज बराच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा तरी.
त्याने गायला सुरुवात केली आणि

" एक आह भरी होगी..
हमने ना सुनी होगी,
जाते जाते तुमने
आवाज तो दी होगी......"

हे ऐकताना खरंच अस वाटलं की मी मेलेयं आणि तो हे गाणं गातोय. नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तेव्हा मी काहीच न बोलता विषय लगेच बदलला. फ़ोन ठेवल्यावर मात्र मला खरंच असं वाटलं की,
मी उद्या मेले तर काय वाटेल याला?
तो लगेच विसरु शकेल का मला?
त्याला दुसरं कुणी आवडेल का माझ्याइतकं?
दुसर्‍या कुणावर तो माझ्यावर करतो तितकच प्रेम करेल का?

संध्याकाळी त्याने फोन केल्यावर तो काही बोलण्याच्या आतंच मी त्याला विचारलं, "उद्या मी मेले तर तु काय करशील?? " मी अचानक विचारलेल्या कुणाचाही गोंधळ उडवणार्‍या प्रश्नाने तोही गोंधळला असावा हे खरं.माझ्या इतर खुळचट प्रश्नाइतकाच हा प्रश्नही त्याला खुळचटच वाटला असावा.

तो म्हणाला, "हे काय बरळते आहे काहिही".
पण मी त्याचं वाक्य मध्येच तोडून त्याला विचारलं, "सांग ना रे? काय करशील?

"त्याने एक बराच मोठा पॉझ घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या गाण्यामुळेच मी असं काहीसं विचारतेय ते. एक मोठा उसासा टाकत तो म्हटला, "तु गेल्यावर त्यानंतरचा प्रत्येक दिवस जगायचा म्हणून जगेन मी. सतत हाच विचार करेन की लवकर हे आयुष्य आटपुया आणि सईकडे जाउया ती तिथं माझ्याविना एकटी़च असेल."

म्हणजे इनशॉर्ट, तोही हेच म्हणाला की तु गेल्यावर तसं काही अडणार नाही माझं.... जगेन मी..... फक्त तुझ्या सहवासामुळे लागलेल्या सवयी त्रास देतील. तुझी खुप आठवण येईल. ज्या ज्या वेळेला आपण बोलायचो फोनवर ती वेळ फार छळेल मला तु गेल्यावर. तुझ्या कवितेतून तुझ्या शब्दातून आठवत बसेन तुला.

माझीही अपेक्षा नव्हतीच की त्यानं रडावं, मी गेल्यावर सगळं सोडून देवदास व्हावं अशी. त्यानं खरंच खुप Practical उत्तर दिलं आणि तेच बरोबर होतं. कारण कुणा एका व्यक्तीमुळे आपण हे आपलं आयुष्य जगतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे कुणी गेल्यावर सगळं संपल असही होत नाही. फक्त त्या व्यक्तीची कमतरता मात्र जाणवते आणि जाणवावीच खर तर.आपण माणुस आहोत आणि खरं म्हणजे आपल्याला मन नावाची गोष्ट देवाने देऊ केलीये हे यावरून कळतं.नाहीतर माणुस आणि जनावर यात फरक तो काय.

म्हणुनच माझी एक माफक आणि छोटीशी अपेक्षा आहे की, मी गेल्यावर माझ्या जवळच्या माणसांनी मी गेल्याच्या दुःखात सगळं सोडून फक्त माझीच आठवण काढत रडत बसावं असं नाही... तर फक्त कुठेतरी, कधीतरी मला, माझ्या आठवणींना, माझ्यासोबत घालवलेल्या चार-दोन क्षणांना आठवावं... एवढचं....

" मेरे जाने पर,
याद ना करना हर वक्त मुझको
पर तुम मुझे भुला न देना
यही ख्वाहीश है मेरी,
जब भी याद आये कुछ पल साथ गुजारे
तब दो आसुही बहा देना"


......सई(सुप्रिया पाटील)

Saturday, September 6, 2008

पाऊस,एफ़.एम आणि सखा

संपली एकदाची युनीट टेस्ट! खरंच शेवटचा पेपर म्हटलं की किती हायसं वाटतं ना? मग तो अगदी युनीट टेस्टचा का असेना.तसंच मलाही आज वाटलं.त्याचाच आनंद मानत college च्या बाहेर पडले आणि बस स्टॉपवर आले.
नेहमीप्रमाणे बसची वाट बघण्यास सज्ज झाले. आता सज्ज झाले वगैरे हे असं ,का असा प्रश्न पडला असेल ना? कारण बसची वाट बघण्यातच अर्धा जीव जातो इथं. बस यायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल असं गॄहीत धरून मी बेस्ट वाल्यांना ४ शिव्याही घालून घेतल्या. मग टाईमपास व्हावा यासाठी एफ.एम लावायचा विचार करतेय तोच कधी नव्हे ती माझी बस चक्क ५ मिनीटात आली.पुन्हा पुन्हा पाहीलं तर खरच २२४- शांतीआश्रम हीच बस होती.
नेहमीप्रमाणे गर्दी होतीच बसमध्ये चढताना. कशीतरी धडपडत बस मध्ये चढले.बसायला जागाही मिळाली. आता जवळपास १ तास फुरसत होती घरी पोचायला. एफ.एम लावला खरा पण window seat नसल्यामूळे गाणी नीट ऎकू येत नव्हती म्हणून mp3 लावून संदीप खरेचं अग्गोबाई ढग्गोबाई non stop १०-१५ वेळा ऎकलं.थोड्याच वेळात window seat मिळाली.
एफ एम लावला आणि कुठल्यातरी स्टेशनवर चांगल गाणं लागेल हे शोधत होते तोच ९८.३-रेडिओ मिरची वर राहत फतेह अली खानने गायलेलं "लागी तुमसे मन की लगन....लगन लागी तुमसे मन की लगन" हे one of my favouirate गाणं लागलं. पुर्णतः मग्न होऊन ते गाणं ऎकलं. तोवर मी म्हणजेच बसने अर्धा रस्ता पार केला होता. एक एक भाव अनुभवला गाण्यातला. गाणं संपल्यावर स्टेशन चेंज केलं तोच रेडीओ सिटी वरही तेच गाणं. ह्या एफ एम वाल्यांच हे नेहमी अनुभवलयं मी. एका स्टेशन वर एखादं गाणं वाजलं ना की थोड्या वेळाने तेच गाणं दुसरया कुठल्यातरी स्टेशनवर वाजतच....असो.
हा असा गाण्यांचा सिलसिला सुरू होता त्यात "मै टल्ली हो गयी" सारखी गाणीही वाजलीच.
पण आज सगळी slow rythem असलेली गाणी ऎकायचा मूड होता. याला कारणही तसंच valid होतं. आज "त्याची" म्हणजेच "सख्याची" खूप आठवण येत होती. अभ्यासाच्या tension मूळे गेले काही दिवस त्याच्याशी नीट बोलताच आलं नव्हत म्हणूनच असेल कदाचित !गाणी ऎकण्याच्या आणि त्याला आठवण्याच्या सिलसिल्यात एक तास इतक्यात निघून गेला.
आज कानाला एफ एम लावुनच बस मधून उतरायचं अस ठरवलं. मोबाईल ठेवला पर्समध्ये आणि हेडसेट तसाच कानाला ठेवून उतरले खाली. का कोण जाणे, पण आज मूड होता तसाच. मध्येच खरखर आली signal नसल्यामुळे. पण उतरल्यावर मात्र आवाज अगदी clear.....
बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला तेवढ्यात. माझ्याकडे नेहमीप्रमाणे छत्री तर नव्हतीच. आणि का ठेवावी छत्री? पाऊस गेले काही दिवस कुठंतरी दडी मारून बसलेला असा अचानक येईल हे थोडीच माहीत होतं मला? आणि असंही मला छत्री न्यायचा नेहमीच कंटाळा येतो आणि बरच झालं पाऊस येत होता. भिजायचा मुड होताच माझा.
त्या रिमझिम पावसात चालत होते आणि तेवढ्यात गाणं लागलं.....
"रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम
भिगी भिगी ऋत मे
हम-तुम हम-तुम चलते है...चलते है.... "
गाणं ऐकताना वाटलं काय situation ला लागलंय गाणं. आणि मी चक्क गाण्यात. हरवले तेही अशी की आजूबाजूला सगळीकडे शांतता आणि पावसात चालणारे "मी" आणि "सखा"(तो) असं imaagine केलं. पण नंतर स्वतःलाच खुळं ठरवत स्वप्नातून बाहेर आले कारण ईथं पाउस होता. रिमझिम-रुमझुम ऋतू पण भिजलेला होता. त्यात चालणारी "हम" म्हणजेच "मी" तर .होते पण माझ्याबरोबर असायला हवा असणारा "तुम" म्हणजेच "सखा" नव्हताच मुळी आत्ता सोबतीला. तो तिथं सातासमुद्रापार, गाढ नाही म्हणता येणार पण साखर झोपेत होता. कारण तेव्हा माझ्याकडे संध्याकाळचे ४.३० आणि त्याच्याकडे सकाळचे ७ वाजले होते.
त्याच्या विचारात घर केव्हा आलं कळलं नाही आणि तोवर गाणंही संपलं होतं. पण दिवसभराचा असलेला थकवा माझ्या चेहरयावर आता मात्र नव्हता तर स्वतःच्याच वेडेपणावरचं छोटंस हसू मात्र होत.
पण आवडलं असतं खरंच मला खुप त्याच्याबरोबर पावसात फिरायला. म्हणजे कसं माहीतेय, त्या गाण्याप्रमाणेच एखादी बाग... शांत आणि नीरव. तिथंच मी आणि तो, रिमझिम पडणारया पावसात भिजणारे,खुप मज्जा करणारे आणि मनसोक्त भिजून झाल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा घेणारे.
पण कसलं काय? असली नुसती स्वप्नच बघायची आम्ही.तो येईल आता पुढल्या उन्हाळ्यात आणि लगेच १५ दिवसांनी जाईलही. त्यामुळे असा योग कधी येईल कोण जाणे? त्यामुळे मला सध्यातरी या स्वप्नावरच धन्यता मानावी लागणार आहे.....

"कधी रे असं होईल?
येणारया पावसात
ओलेत्या दिवसात
आपली भेट होईल... ".

.......सई(सुप्रिया पाटील)

Tuesday, August 26, 2008

दुरुन डोंगर साजरे...

दुरदेशी असलेल्या मुलाची व्यथा...प्रयत्न केलायं बघा जमलाय का?
:
:
:
इथं दुरदेशी आलोय मी
पण खरतर फ़ार फ़ार एकटा पडलोय मी
खुप खुप पश्चाताप होतो
माझ्या तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा
विचार येतो फ़क्त "करियर ग्रोथ" आणि
"गलेलठ्ठ पगार" एवढच हवं का जगायला
सांग ना गं सये...
तु का "नको जाउस" अस म्हणालीस
का नाहीस थांबवलस मला
आता ना हे एकटेपण खातयं गं मला
फ़क्त घर आणि ऑफ़िस एवढच विश्व उरलयं
घर तरी का म्हणु...कुणी वाट बघणारं इथं कुठं राहीलयं
पिंजर्‍यात बंद आहे मी अस वाटत
जो तोडून बाहेरही नाही पडू शकत
खुप आठवतो मायदेश
आई-वडीलांची माया,तुझं खुळं प्रेम,मित्र...
आईच्या हातच जेवण...सगळचं
तिथले संस्कार तिथली संस्कृती...
त्याउलट आहे हा परदेस
खरचं गं सये,
कळतयं आता आपलं ते आपलं
डोंगर नेहमी दुरुनच साजरं...

....सई(सुप्रिया पाटील)

...सत्य...

सत्य समोर आलं की
घाबरतात सारे सामोर जायला...
देतात संस्कृतीचे दाखले उगा
"आपल्यात नाही हं असलं काही घडत.."
अस म्हणून दुर्लक्ष करतात सत्याकडे
पूर्वी हाय सोसायटीत घडायचं.. घडतयं ते आता सगळीकडे
wife swapping काय नि डिस्कोथेकमधे
रात्र घालवारी तरुणाई काय..
only fun is imporatant...
पैसे जास्त मिळतात ना त्याच करणार तरी काय???
म्हणुनच हातात त्यांच्या मद्याचे पेले येतात.
तुमची so called संस्कृती ज्यात ते रिचवतात.
आपण मात्र अगदी ढीम्म होऊन बघत राहतो.
आणलं कुणी समोर हे तर,
त्यालाच संस्कृती शिकवतो.
संस्कार सारे नामशेष होतायत आता...
कमी पडतो पॉकेट मनी म्हणून मुली
कॉल गर्ल म्हणून स्वतःला विकतायत आता...
आपण मात्र फ़क्त बघ्यांची काम करतोयं..
आणि पडणार्‍या संस्कृतीच्या भिंती
सावरण्याचा प्रयत्न करतोयं...
खरचं प्रयत्न करतोयं का??????

....सई(सुप्रिया पाटील)

आई

लग्नाचा बाजार...

बाजारच झालाय सगळा...
अपेक्षा ठेवायच्या नुसत्या
शिकलेली,सुंदर मुलगी आणि त्यात हवा हुंडा लाखभर,
दागिनेही हवेतच हं १५-२० तोळ्याचे...
बिचार्‍या मुलीच्या बापाला खर्चात भर..
म्हणे "इंजिनियर आहे मुलगा"
शोधून मिळायचा नाही ’वर’ असा..
इतकं करुनही यांच्या अपेक्षा नाही सरत
नाही झाल्या पुर्ण या अपेक्षा की,
मुलीला बसतील जाच करत.
सोसायचं सार वधुपक्षानेच
हा जणु नियमच झालयं
लग्नाच्या ह्या बाजारात जणु
आम्हा "मुलींना" भाव उरेनासा झालायं...

....सई(सुप्रिया पाटील)

...देव...

दर्शन घ्यायला आले होते रे...
पण तेही धड मिळालं नाही
तुझ्याशी बोलायचं तर दुरच राहीलं...
नुसती घाई गडबड..
मग शेवटी तिथे लावलेल्या,
टी.व्ही वरच तुझं नीट दर्शन घेतलं..
आणि मनात जे होत ते तुझ्याजवळ मांडलं...
द्यायला काहीच नव्हतं माझ्याकडे,
आणि पासही नव्हता...
म्हणुन असं झालं असेल का?
म्हणजे बघ ना कस...
वी आइ पी पास वाल्यांना,
ओळखीच्या लोकांना,
निवांत दर्शन मिळतं...
आम्ही मात्र ४-४ तास उभं रांगेत रहायचं...
आणि तु धड आम्हाला तोंडही नाही दाखवायचं...
अस का रे देवा?????
तु आता फ़क्त श्रीमंतांचाच राहीलायसं का????

....सई(सुप्रिया पाटील)

झाली कविता बाजरू..!!!

माझ्या कवितेत आता
नाही तो सागर गहीरा
आता आहे तिथे
फ़क्त पैशांचा पहारा..!

माझ्या कवितेत आता
नाही ती संध्याकाळ वेडी
आली भावनांनाही आता
कुणा सांगणार्‍याची बेडी...!

माझी कविता आता
नाचे पैशाच्या तालावर
झालाय तिला आता
भावनांचा अनादर..!

आधी होती माझी कविता
एक स्वच्छंद पाखरु
आता मात्र झाली
माझी कविता बाजरू..!!!

....सई(सुप्रिया पाटील)

Monday, August 25, 2008

सुर

मी देतो तुला साथ
माझ्या स्वरांची...
तू फ़क्त तुझ्या
संगिताचे राग घेऊन
माझ्या सानिसेच्या सुरांसोबत
तुझ्या वीणेच्या सुरांना
एकरुप करण्या
नव्या सुराला जन्म देण्या
सये तू ये.....

...सई

Sunday, August 24, 2008

तू ये...

भावना ह्या वेड्या..
कवितेत ढाळण्या...
तुच गं माझ्या
मनीचे बोल होऊन ये...

चांदण्याचा थवा
अन कुंद धुंद हवा
माझी चांदणी होऊन
उधळीत प्रकाश...तू ये...

...सई

सये तू ये....

निळ्या आसमंताची
निळाई लेवुन
त्या खोल नदीची
गहराई घेउन
त्या बेभान वार्याला
श्वासात भरुन
मला सुखावण्या
सये तू ये....
मुक्त मुक्त तुझे श्वास
धुंद धुंद ही वेडी रात
या रातीत सये
तुझा सहवास देण्या
बेधुंद होऊन
फ़क्त माझी होण्या
सये तू ये......

.....सई

तू ये....

वेड्या भावनांना
वाट करुन देण्या...
अमुर्त प्रेमाला
मुर्तता देण्या....
माझ्या सुरांत
सुर जुळवण्या...
माझ्या मनाचा
ठाव गं घेण्या....
न बोलता काही
फ़क्त नजरेने
गुज करण्या...
मलाच मजपासुन
चोरण्या..सये तू ये....

...सई

Saturday, August 16, 2008

एकटा

या जगाचा रे मित्रा
हा वेडा नियम आहे
एकटे येऊन सार्यांस
एकटेच जाणे आहे

सार्यांनाच शाप येथे
असे एकलेपणाचा
तू हा असा एकटा
कुणी असे गर्दीतही एकटा

नको वेळ दवडू व्यर्थ
मूळ शोधण्या एकटेपणाचे
त्यापेक्षा अनुभव आयुष्य
शोध नवे मार्ग जगण्याचे

.....सई(सुप्रिया पाटील)

Wednesday, July 23, 2008

विरहाचं लेणं...

तुझ्या विरहाचं लेणं
माझ्या डोळ्यात
नेहमीच अश्रुरुपात असतं
तुझ्या डोळ्यातलं आभाळ मात्र
नेहमी कसं कोरडसं असतं
मला मोकळं झाल्याशिवाय
चैनच पडत नाही...
तुला कसं अस सगळं
मनात ठेवणं जमत???

....सई(सुप्रिया पाटील)

तु सोबत असताना....

भांडते आकाशाशी...
तुझ्या आठवांशी भांडताना...
नाही ना रे जमत ते
तु सोबत असताना...
:
:
तु सोबत असताना,
वेडं मन कधी दुःखाने
भरुनच येत नाही...
म्हणुनच तुझ्यासोबत असताना
रडावसं वाटत नाही..
डोळ्यात पाणी आलं तरी आनंदानं येतं..
पण हसण्या हसण्यात ते पाणी,
डोळ्यातच विरुन जातं...
मग सांग कशी रडू तु सोबत असताना???

....सई(सुप्रिया पाटील)

मनाचं आभाळ...

तू जवळ नसताना नेहमीच
मनाचं आभाळ भरुन येतं...
डोळ्यातुन आसवांवाटे
तेही मग कोसळून जातं...
मोकळ्या झालेल्या
त्या स्वच्छ आभाळी
तुला चांदणी दिसते...
तुला मात्र ती
माझ्यासारखी भासते...

...सई(सुप्रिया पाटील)

Thursday, July 17, 2008

तुझी स्वप्नं...

वार्‍यावर लहरते मी...
अंबर कवेत घेते मी...
स्वप्नांना त्या
मोरपिसापरि जपते मी..
झुळझुळणार्‍या नदी-खळ्यातुन
ओघळणार्‍या दव-थेंबातुन
डुलणार्‍या रानफ़ुलातुन
चमचमणार्‍या चांदतार्यातुन
पावसाच्या प्रत्येक सरीतुन
गोंडस फ़ुलाच्या गंधातुन
कणाकणातुन-मनामनातुन
तुझी स्वप्न जपते रे...
तुझ्या स्वप्नांशि बोलते रे..
तुझी स्वप्न जागते रे....
तुझी स्वप्न जगते रे....

...सई(सुप्रिया पाटील)

...ओंजळ...

हं...खरचं नाही जमत स्वप्नांना विसरणं...
आणि ज्याच्यासोबत पाहिलीत त्यालाही...
म्हणुनच कठीण होतय मलाही...
तुला विसरणं...
अजुनही माझ्याकडून होतयं
प्रत्येक स्वप्नात तुलाच जपणं...
आता जपेन तुझी स्वप्न...
नाही हरवू देणार...
ठेवेन नेहमी सोबतच....
भरुन घे तुझी ओंजळ..
पण एक सांगते
यापुढे तुझी ओंजळ
कधीच रिती राहणार नाही
याची गाठ बांधते...

...सई(सुप्रिया पाटील)

सौदागर स्वप्नांचा...

तुझी ओंजळ कशी रिती????
तू तर सौदागर स्वप्नांचा...
माझी नाही तर मिळतीलच
कुणाची ना कुणाची स्वप्न तुला...
माझं काय रे....पुरेल तु दिलेला
क्षणिक सुगंध मला....
स्वप्न तर हवीच रे....
आयुष्य जगण्यासाठी...
पुढे पुढे जाण्यासाठी...
स्वप्न नसतात हं क्षणिक..
गैरसमज आहे तुझा..
मिरवतो आम्ही
पूर्ण-अपुर्ण स्वप्नांचा बोझा...
नाही जमत तुझ्यासरखं...
सौदा झाला की विसरणं...

....सई(सुप्रिया पाटील)

...सुगंधी स्वप्न...

हो रे....... खरचं थकलेयं....
भिरभिरणार्‍या स्वप्नांमागे धावुन
पुरती दम्लेयं....
मोगर्‍याची फ़ुलं...असेल का ना स्वप्नातली...
पण सुगंध देतायत ना....तेच बस झालं...
पण तुच सांग सख्या....
नेहमीसाठी गंधीत करतील का माझ्या स्वप्नांना...???
सुकल्यावर फ़ुलं कसला आलायं गंध...
पापण्यांना येईल आसवांचा बंध...
मग उगाच का देतोयसं क्षणिक सुखाचा आनंद...

...सई

स्वप्नांचा सौदा...

असं का म्हणतेस????
स्वप्नांचा सौदा मी स्वप्नांच्या बद्ल्यात करतो..
तिथं कसला आलायं भाव???
महाग आणि स्वस्त...
हे या बाजारात,
ठरवायचचं नसतं
इथं फ़क्त स्वप्न पहायची असतात...
माझं तर कामच ते...
स्वप्न दाखवणं....
खरचटतात का मनं???
मग मी...माझं काय होत असेल...
स्वतःच मन मारुन जेव्हा
मी 'माझ्या' स्वप्नांचा सौदा करत असेल....

....सई

...स्वप्नांचा बाजार...

कळतयं रे...तो माझ्या स्वप्नांचा मुसाफ़िर
खरचं असा...वारा होऊन दुर दुर जाणारा....
मी जपलेल्या आठवणींनाही स्वतःसोबत नेणारा...
खरच वेडीच आहे मी...ठार वेडी....
दूर जाणार्या त्याला आणि स्वतःसोबत...
माझ्या स्वप्नांनाही नेणार्याला...
थांबवू पाहतेयं....घालू पाहतेयं माझ्या प्रेमाची बेडी...
पण आता ठरवलयं...दुरच रहायचं त्याच्यापासून....
त्याच्या आठवणींपासून....
स्वप्नातही येऊ नाही द्यायचं त्याला....
याचा अर्थ असा नाही की, स्वप्नांपासूनच तोडतेय स्वतःला...
बोलणार मी स्वप्नांशी.... बघेन मी स्वप्न,
रंगवणार नवीन स्वप्न...
फ़क्त एवढच करेन....वाटलं कितीही तरी...
त्याची स्वप्न मी बघणार नाही....
माझ्या स्वप्नांचा असा पुन्हा बाजार त्याला करू देणार नाही...

...सई(सुप्रिया पाटील)

...वेडी स्वप्नं...

खरचं..असतोच स्वप्नांना प्रकाशाचा धाक...
कारण उजळता आकाश अन् येता सुर्य
ती होऊन जातात खाक...
विरून जातात प्रकाशासोबत...
उडुन जातात वार्यासोबत...
नाही उरत काहीच....
खरचं????...असं कसं...उरत ना काहीतरी..आठवणी...
आठवणी तर उरतात...मग त्या स्वप्नातल्या का होईना...
जपते आपली स्वपन आठवणी म्हणून...
त्या वाहून गेलेल्या वार्याच्या मागे जाते...
येणार नाही हातात कधी ती स्वप्न...हे माहीत असून...
त्या वेड्या स्वप्नांच्या मागे धावते...
स्वप्नांशी बोलते...त्यांच्याशी भांडतेही...
ही वेडी स्वप्नही बघ ना कशी...
सारखी मला खुणावतायतं स्वतःकडे..
ओढून घेतायतं...स्वतःकडे...
अगदी वाळवंटातल्य़ा मृगजळासरखी....

...सई(सुप्रिया पाटील)

Thursday, June 26, 2008

शब्द माझे...(गझल)

गज़ल लिहीण्याचा प्रयत्न पहील्यांदाच केलायं.....माझी पहीली गज़ल कशी वाटते ते जरुर सांगा

वृत्त:-गागालगा गागालगा गा





...प्रेमसरी...

Tuesday, June 17, 2008

पाऊस...असाच काहीसा...

एका तरुण मुलाच्या point of view ने लिहीलेली कविता...बघा कसा वाटतोय प्रयत्न

Wednesday, May 28, 2008

...थेंब पावसाचे...

...स्वरवेडा...

तुझ्या शब्दांना अर्थ देण्या....

येशील??म्हणजे....
तुझ्या या आर्त हाकेला तरी मला साद द्यावीच लागेल....
आणि सख्या.... मी नाही दिली तरी...
माझे सुर...माझे सुर कसे दुर पळू शकतील...
मला यावचं लागेल....
तुझ्या शब्दांना माझा सुर द्यावाच लागेल...
येईन मी...तुझ्या शब्दांना सुर देण्या...
तुझ्या शब्दांना अर्थ देण्या....
माझ्या सुरांनी तुझे शब्द पुन्हा बहरतील..
अन तुझ्या शब्दांमूळे माझे सुर...
मला पुन्हा नव्याने गवसतील....
तुझ्यासाठी...तुझ्या शब्दांसाठी....
मी परत येईन...
तेव्हा होईल.... तुझ्या शब्दांचा अन माझ्या सुरांचा नवीन जन्म
होईल ना??????

....सई(सुप्रिया पाटील)

फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी....

माझ्या राजा...असं नाहीये काही...
:
:
:
सुर खुलुन येतात माझे
कारण त्यांना साज देतात शब्द तुझे
तुझ्या शब्दांतून तु माझ्या ्सुरांना
एक नवा अर्थ देतोस...
अन त्यातुनच आपल्या सुंदर आयुष्याच गाणं निर्माण करतोस...
खरतरं तुझे शब्द आहेत म्हणून गाते मी...
माझे सुर जन्म घेतात...
ते फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी...फ़क्त तुझ्याचसाठी...

....सई(सुप्रिया पाटील)

...जीवनगाणं...

मी नाही एकटा पुर्ण करत तुझं गीत
त्यापेक्षा आपण दोघांनी मिळुन
आपल ’जीवनगाणं’ लिहुया...
त्याला योग्य रागात बसवुन...
तुझे अन माझे स्वर जुळवुन गाउया...
;
;
ऎ राणी.....सांग ना?माझी होउन गाशील ना माझ्यासोबत?
तुझे सुर माझ्या स्वरांत मिसळुन.....
करशील ना आपल जीवनगाणं पुर्ण???सांग ना राणी....???

....सई(सुप्रिया पाटील)

...मीच मी...

कुठं गं एकट टाकलयं तुला....
तुझ्यातच आहे मी
जरा नीट शोध मला....
तुझ्या प्रत्येक स्वरात मी....
’सप्तक’ स्वरात ढाळताना
’सा’ पासुन ’नी’ पर्यंत मीच मी....
तुच म्हणतेस ना....
तुझ्या श्वासातही मीच मी....

....सई

Monday, May 12, 2008

...आंधळ्यांचं जग...

बघु न शकणार्‍या व्यक्तींच मनोगत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतु नाही.



...विचार...

विचार..... बाई गं...कधीच पाठ सोडत नाहीत कोणाची...
कसला ना कसला विचार चालुच असतो प्रत्येकाच्या मनात....कोणी अभ्यासचा विचार करतं... तर कुणी नोकरीचा....कुणी मुलाबाळांचा तर कुणी बायकोचा......कुणी फ़क्त स्वताचा ,तर कुणी निःस्वार्थी होउन फ़क्त दुसर्‍यांचा..आणि एखाद्याला विचार करायला काहीच विषय नसेल तर दुसरं कुणी कसला विचार करतयं याचाचं विचार पडलेला असतो.... विचार करायला विषय कधी कमी पडलेच नाहीत माणसाला.... शांतता तर अजिबात नाही मनाची....नेहमी आपली गर्दी विचारांची....ही विचारांची शृंखला कधी थांबायचं नावचं घेत नाही मुळी.....नुसता आपला कसला ना कसला विचार....कंटाळा येतो बाई विचारांचा...सोडा ना कधीतरी शांत,निवांत...पण नाही.... असं कधी होतचं नाही...
म्हणतात बुआ....ही विचारांची शॄंखला म्हणे झोपल्यावर थांबते...खरचं का????
मला नाही वाटत असं.....
झोपतं ते फ़क्त शरीर....विचार तर छळतातचं की मनाला....स्वप्नांच्या रुपात....हो ना??????

..........सई(सुप्रिया पाटील)