Wednesday, September 17, 2008

चिठ्ठी ना कोई संदेस...

रविवार असल्यामुळे जरासं 'चेंज' म्हणून सगळेचजण आज झोपेतुन लेट उठलो होतो. दररोज ११ वाजेपर्यंत आपापल्या कामांमध्ये मशगूल होणारे आम्ही अजुन मात्र निवांतपणे चहा नाश्ता एँन्जाय करत होतो. जरा वेळाने मम्मीने स्वयंपाकाला सुरुवात केली पण मी आळशी त्यामुळे तिला मदत न करता ऑर्कुटींग करत बसले..आज हक्काचा दिवस आहे असं समजून.

१-२ तास मजेत ऑर्कुटींग झाल्यावर जेवायला गेले. इतक्यात पप्पांचे मित्र सरतापे यांचा फ़ोन आला. पप्पा जेवत होते. सो.. फ़ोन मी उचलला. "पप्पाना फ़ोन दे" इतकचं बोलले सरतापे. त्यांच्या आवाजात कसलसं टेंशन जाणवत होत. मी पप्पांना फ़ोन दिला. "अरे मी या शिवम हॉस्पिटलमधे आहे. शिंदेच्या मुलीला डॉक्टर अँडमिट करायचं म्हणतायत. तु जरा ये. तो घाबरल्यासारखा वाटतोय" असं काहिसं म्हणाले ते.
घाबरणारच ना! कुठलाही पुरुष जेव्हा बाप होतो, तोही मुलीचा तेव्हा तो पुरुष असला तरी हळवा बनतो आणि काळजी करतो, ती एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त भावनाप्रधान होऊन. पप्पांनी लगेच हात धुतला आणि तयारी करुन निघाले. मम्मीही गेली पप्पांसोबत.

शिंदेकाका हे आमचे फ़ँमिली फ़्रेंड होते. त्यांची मुलगी, स्नेहा ९ वी मधे शिकायला होती. त्यामुळे आम्हालाही तसं टेंशनच आलं होतं.आणि का कोण जाणे माझ्या मनाला विचित्र भिती वाटली.

थोड्या वेळाने मीही जाणारच होते. घाईघाईने घरातली कामं आटोपत होते तोच पप्पांचा फ़ोन आला, स्नेहा गेली म्हणुन.माझ्या मनाची भिती खरी ठरली. रडु आवरेनासंच झालं. ती एवढुशी स्नेहा डोळ्यासमोर आली. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळ्या आठवणी आठवल्या.काल-परवा डोळ्यासमोर असणारी व्यक्ती अशी अचानक गेली यावर विश्वासच बसेना.आणि हुंदकेही आवरेना.

कसं ना माणसाचं काहीच सांगता येत नाही कधी काय होईल ते. फ़क्त उलटी आणि तापाचं निमित्त झालं आणि स्नेहा हे जग कायमच सोडून गेली.

कुणी वारलं ओळखीतलं किंवा अनोळखी जरी...म्हणजे मरणाची बातमी मग ती कुणाचीही असो कशीही कानावर आली तरी का कुणास ठावुक लगेच माझ्या मनात विचार येतो की उद्या मीही अशीच चालता बोलता निघून गेले तर? कधी ना कधी मी मरणार तर आहेच. पण तरीही असा विचार येतो आणि खुप वेळ मी हाच विचार करत बसते.

मी मेले तर सगळ्यात जास्त कोण रडेल?
कोणाला सगळ्यात जास्त वाईट वाटेल?

तसं कुणाचं फ़ार काही अडेल असं नाहीये. पण तरीही माणसाचं मनंच असं, 'आपल्यावाचुन कुणाचं काहीच अडत नाही' हा विचारही किती त्रास देतो नाही का? माझंही तसंच. मीही एक सर्वसामान्यचं आहे ना.
आज तसंच काहीसं झालं.

"चिठ्ठी ना कोई संदेस...
जाने वो कोनसा देस,
जहाँ तुम चले गये..."

हे जगजीतचं गाणं ऎकताना विचार भरकटायला लागले. आधी फ़क्त एक गाणं म्हणुन ऎकल आणि मग जेव्हा मन लावुन ऎकल तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द घुसत गेला मनात.

न राहवुन मी सख्याला विचारलं 'तु हे गाणं ऎकलयसं का?' तर तो म्हणाला की 'हे गाणं तर मला पाठ आहे' आणि त्याने चक्क गायला सुरुवात केली. तसा त्याचा आवाज बराच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा तरी.
त्याने गायला सुरुवात केली आणि

" एक आह भरी होगी..
हमने ना सुनी होगी,
जाते जाते तुमने
आवाज तो दी होगी......"

हे ऐकताना खरंच अस वाटलं की मी मेलेयं आणि तो हे गाणं गातोय. नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तेव्हा मी काहीच न बोलता विषय लगेच बदलला. फ़ोन ठेवल्यावर मात्र मला खरंच असं वाटलं की,
मी उद्या मेले तर काय वाटेल याला?
तो लगेच विसरु शकेल का मला?
त्याला दुसरं कुणी आवडेल का माझ्याइतकं?
दुसर्‍या कुणावर तो माझ्यावर करतो तितकच प्रेम करेल का?

संध्याकाळी त्याने फोन केल्यावर तो काही बोलण्याच्या आतंच मी त्याला विचारलं, "उद्या मी मेले तर तु काय करशील?? " मी अचानक विचारलेल्या कुणाचाही गोंधळ उडवणार्‍या प्रश्नाने तोही गोंधळला असावा हे खरं.माझ्या इतर खुळचट प्रश्नाइतकाच हा प्रश्नही त्याला खुळचटच वाटला असावा.

तो म्हणाला, "हे काय बरळते आहे काहिही".
पण मी त्याचं वाक्य मध्येच तोडून त्याला विचारलं, "सांग ना रे? काय करशील?

"त्याने एक बराच मोठा पॉझ घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या गाण्यामुळेच मी असं काहीसं विचारतेय ते. एक मोठा उसासा टाकत तो म्हटला, "तु गेल्यावर त्यानंतरचा प्रत्येक दिवस जगायचा म्हणून जगेन मी. सतत हाच विचार करेन की लवकर हे आयुष्य आटपुया आणि सईकडे जाउया ती तिथं माझ्याविना एकटी़च असेल."

म्हणजे इनशॉर्ट, तोही हेच म्हणाला की तु गेल्यावर तसं काही अडणार नाही माझं.... जगेन मी..... फक्त तुझ्या सहवासामुळे लागलेल्या सवयी त्रास देतील. तुझी खुप आठवण येईल. ज्या ज्या वेळेला आपण बोलायचो फोनवर ती वेळ फार छळेल मला तु गेल्यावर. तुझ्या कवितेतून तुझ्या शब्दातून आठवत बसेन तुला.

माझीही अपेक्षा नव्हतीच की त्यानं रडावं, मी गेल्यावर सगळं सोडून देवदास व्हावं अशी. त्यानं खरंच खुप Practical उत्तर दिलं आणि तेच बरोबर होतं. कारण कुणा एका व्यक्तीमुळे आपण हे आपलं आयुष्य जगतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे कुणी गेल्यावर सगळं संपल असही होत नाही. फक्त त्या व्यक्तीची कमतरता मात्र जाणवते आणि जाणवावीच खर तर.आपण माणुस आहोत आणि खरं म्हणजे आपल्याला मन नावाची गोष्ट देवाने देऊ केलीये हे यावरून कळतं.नाहीतर माणुस आणि जनावर यात फरक तो काय.

म्हणुनच माझी एक माफक आणि छोटीशी अपेक्षा आहे की, मी गेल्यावर माझ्या जवळच्या माणसांनी मी गेल्याच्या दुःखात सगळं सोडून फक्त माझीच आठवण काढत रडत बसावं असं नाही... तर फक्त कुठेतरी, कधीतरी मला, माझ्या आठवणींना, माझ्यासोबत घालवलेल्या चार-दोन क्षणांना आठवावं... एवढचं....

" मेरे जाने पर,
याद ना करना हर वक्त मुझको
पर तुम मुझे भुला न देना
यही ख्वाहीश है मेरी,
जब भी याद आये कुछ पल साथ गुजारे
तब दो आसुही बहा देना"


......सई(सुप्रिया पाटील)

Saturday, September 6, 2008

पाऊस,एफ़.एम आणि सखा

संपली एकदाची युनीट टेस्ट! खरंच शेवटचा पेपर म्हटलं की किती हायसं वाटतं ना? मग तो अगदी युनीट टेस्टचा का असेना.तसंच मलाही आज वाटलं.त्याचाच आनंद मानत college च्या बाहेर पडले आणि बस स्टॉपवर आले.
नेहमीप्रमाणे बसची वाट बघण्यास सज्ज झाले. आता सज्ज झाले वगैरे हे असं ,का असा प्रश्न पडला असेल ना? कारण बसची वाट बघण्यातच अर्धा जीव जातो इथं. बस यायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल असं गॄहीत धरून मी बेस्ट वाल्यांना ४ शिव्याही घालून घेतल्या. मग टाईमपास व्हावा यासाठी एफ.एम लावायचा विचार करतेय तोच कधी नव्हे ती माझी बस चक्क ५ मिनीटात आली.पुन्हा पुन्हा पाहीलं तर खरच २२४- शांतीआश्रम हीच बस होती.
नेहमीप्रमाणे गर्दी होतीच बसमध्ये चढताना. कशीतरी धडपडत बस मध्ये चढले.बसायला जागाही मिळाली. आता जवळपास १ तास फुरसत होती घरी पोचायला. एफ.एम लावला खरा पण window seat नसल्यामूळे गाणी नीट ऎकू येत नव्हती म्हणून mp3 लावून संदीप खरेचं अग्गोबाई ढग्गोबाई non stop १०-१५ वेळा ऎकलं.थोड्याच वेळात window seat मिळाली.
एफ एम लावला आणि कुठल्यातरी स्टेशनवर चांगल गाणं लागेल हे शोधत होते तोच ९८.३-रेडिओ मिरची वर राहत फतेह अली खानने गायलेलं "लागी तुमसे मन की लगन....लगन लागी तुमसे मन की लगन" हे one of my favouirate गाणं लागलं. पुर्णतः मग्न होऊन ते गाणं ऎकलं. तोवर मी म्हणजेच बसने अर्धा रस्ता पार केला होता. एक एक भाव अनुभवला गाण्यातला. गाणं संपल्यावर स्टेशन चेंज केलं तोच रेडीओ सिटी वरही तेच गाणं. ह्या एफ एम वाल्यांच हे नेहमी अनुभवलयं मी. एका स्टेशन वर एखादं गाणं वाजलं ना की थोड्या वेळाने तेच गाणं दुसरया कुठल्यातरी स्टेशनवर वाजतच....असो.
हा असा गाण्यांचा सिलसिला सुरू होता त्यात "मै टल्ली हो गयी" सारखी गाणीही वाजलीच.
पण आज सगळी slow rythem असलेली गाणी ऎकायचा मूड होता. याला कारणही तसंच valid होतं. आज "त्याची" म्हणजेच "सख्याची" खूप आठवण येत होती. अभ्यासाच्या tension मूळे गेले काही दिवस त्याच्याशी नीट बोलताच आलं नव्हत म्हणूनच असेल कदाचित !गाणी ऎकण्याच्या आणि त्याला आठवण्याच्या सिलसिल्यात एक तास इतक्यात निघून गेला.
आज कानाला एफ एम लावुनच बस मधून उतरायचं अस ठरवलं. मोबाईल ठेवला पर्समध्ये आणि हेडसेट तसाच कानाला ठेवून उतरले खाली. का कोण जाणे, पण आज मूड होता तसाच. मध्येच खरखर आली signal नसल्यामुळे. पण उतरल्यावर मात्र आवाज अगदी clear.....
बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला तेवढ्यात. माझ्याकडे नेहमीप्रमाणे छत्री तर नव्हतीच. आणि का ठेवावी छत्री? पाऊस गेले काही दिवस कुठंतरी दडी मारून बसलेला असा अचानक येईल हे थोडीच माहीत होतं मला? आणि असंही मला छत्री न्यायचा नेहमीच कंटाळा येतो आणि बरच झालं पाऊस येत होता. भिजायचा मुड होताच माझा.
त्या रिमझिम पावसात चालत होते आणि तेवढ्यात गाणं लागलं.....
"रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम
भिगी भिगी ऋत मे
हम-तुम हम-तुम चलते है...चलते है.... "
गाणं ऐकताना वाटलं काय situation ला लागलंय गाणं. आणि मी चक्क गाण्यात. हरवले तेही अशी की आजूबाजूला सगळीकडे शांतता आणि पावसात चालणारे "मी" आणि "सखा"(तो) असं imaagine केलं. पण नंतर स्वतःलाच खुळं ठरवत स्वप्नातून बाहेर आले कारण ईथं पाउस होता. रिमझिम-रुमझुम ऋतू पण भिजलेला होता. त्यात चालणारी "हम" म्हणजेच "मी" तर .होते पण माझ्याबरोबर असायला हवा असणारा "तुम" म्हणजेच "सखा" नव्हताच मुळी आत्ता सोबतीला. तो तिथं सातासमुद्रापार, गाढ नाही म्हणता येणार पण साखर झोपेत होता. कारण तेव्हा माझ्याकडे संध्याकाळचे ४.३० आणि त्याच्याकडे सकाळचे ७ वाजले होते.
त्याच्या विचारात घर केव्हा आलं कळलं नाही आणि तोवर गाणंही संपलं होतं. पण दिवसभराचा असलेला थकवा माझ्या चेहरयावर आता मात्र नव्हता तर स्वतःच्याच वेडेपणावरचं छोटंस हसू मात्र होत.
पण आवडलं असतं खरंच मला खुप त्याच्याबरोबर पावसात फिरायला. म्हणजे कसं माहीतेय, त्या गाण्याप्रमाणेच एखादी बाग... शांत आणि नीरव. तिथंच मी आणि तो, रिमझिम पडणारया पावसात भिजणारे,खुप मज्जा करणारे आणि मनसोक्त भिजून झाल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा घेणारे.
पण कसलं काय? असली नुसती स्वप्नच बघायची आम्ही.तो येईल आता पुढल्या उन्हाळ्यात आणि लगेच १५ दिवसांनी जाईलही. त्यामुळे असा योग कधी येईल कोण जाणे? त्यामुळे मला सध्यातरी या स्वप्नावरच धन्यता मानावी लागणार आहे.....

"कधी रे असं होईल?
येणारया पावसात
ओलेत्या दिवसात
आपली भेट होईल... ".

.......सई(सुप्रिया पाटील)