Monday, November 24, 2008

"अखेरचे गीत"

"प्रेमभावना"

दाटी आभाळ तसेच
पण नसे तुझी साथ
वाटे खोली ही परकी
वाटे परकेच अंगण...!

माझ्या भाळी दुसर्‍याचे
आता कुंकु रे वसते
मनी तुझीच परि मी
प्रेमभावना रे जपते...!

येता पाऊस वळवाचा
तुझी याद सख्या येते
त्याच्या प्रत्येक थेंबात
मज तुझा स्पर्श देते...!

येता सांजवेळ सख्या
मन व्याकुळ रे होई
वाट पाही तुझ्या येण्याची
पण कुंकुवाचा धनी येई...!

....सई

Thursday, November 20, 2008

"भुतकाळाचे काजळ"

माझ्या डोळ्यात सदा
असे तुझाच दरवळ...
जणू ल्यायले मी,
भुतकाळाचे काजळ...!

मनातही सारखा
असे तुझाच चेहरा...
तुझा आठवांचा जणु
मजवर आहे पहारा...!

कसा रे हा आपुल्य़ा
प्रेमाचा हा असा डोह...
दुर सारलो गेलो तरी
देई वेदना नेहमी दाह..!

...सई

"पाऊसवेडी"

ऋतु आला पावसाळी
सार्‍या मातीला सुगंध
मनी आठवांच्या तुझ्या
सख्या येतो रे गंध...!

आठवे भेट आपुली
होता पावसाचा जोर
चिंब झालेल्या मला
तुझ्या मिठीचा आधार...!

तुझ्या प्रेमाच्या सरीत
माझा अणु-रेणु भिजलेला
तेव्हा पाऊसही कसा
खट्याळ होऊन बरसलेला...!

ओसरता पाऊस जसा
येई निसर्गात गारवा
माझ्या मनातही सख्या
तुझ्या आठवांचा पारवा...!

आला पाऊस की मी
होते रे "पाऊसवेडी"
जशी तुझिया प्रेमात
आहे मी रे "प्रेमवेडी"...!

....सई

प्रेमाचा सोहळा..

आकाशाच्या कुशीत
चांदणं अलगद निजेल
तुझ्या कुशीत येऊन
प्रेमात मी चिंब भिजेन...!

गारठलेल्या पहाटेत हवी
ऊब तुझ्या मिठीची
तुझ्या बेभान स्पर्शात
न उरेन मी माझी...!

स्वप्नातल सारच कस
सत्यात उतरलेलं असेल
तुझ्या माझ्या प्रेमाला
पारिजातकाची साथ असेल...!

रंगुन रंगात तुझिया
होई रंग माझा वेगळा
सकाळही करेल साजरा
आपल्या प्रेमाचा सोहळा...!

.....सई