Wednesday, December 17, 2008

आत्मविश्वाचे थवे...

कोंडलेल्या भावनांना
तु वाट नवी दे..
अंधारमय आयुष्याला
आशेची पहाट नवी दे...

स्वतःच्या हाताने
तु नशीब घडव.
हातावरच्या रेषा आता
धेयाच्या दिशेने वळव...

मुक्त मुक्त श्वासातुन
गा तु गीत नवे ...
तुझ्या स्वरातुन सदा
येवो आत्मविश्वाचे थवे...

...सई(सुप्रिया पाटील)

सोनेरी स्पर्श

तुझ्या मिठित येता
विसरते माझे भान
जसे पावसात भिजते
चिंब-चिंब पान पान...

तुझ्या रंगात रंगता
सांग सावरावे कसे
स्पर्श तुझा होता
भाव आवरती कसे...?

अणु-रेणु या तनाचा
स्पर्शाने शहारला...
तुझा सोनेरी स्पर्श
रोमारोमात भिनला..

...सई(सुप्रिया पाटील)

खुळं..

आठवांच्या झुल्यांवर
हिंदोळा घेतो
आपणही खुळे
प्रेमात या होतो...!

चंद्र-तार्यांना
शब्दात उतरवतो
जागुन त्यांच्यासोबत
कविता रचतो...!

आपल्याच विश्वात
खुळ्यागत रमतो
प्रेमालाही आपण
खुळं बनवतो..!

...सई(सुप्रिया पाटील)

बोल ना..!

तुझ्या आसवांत सये
शब्द वाहु का गं देते
गीत मनात दाटवुनी
अशी भाव लपवते..!

माझ्या शब्दातं गं तु्ला
जशी ऊब मिळे प्रेमाची
तशी मलाही हवी राणी
उबदार कुस तुझ्या शब्दांची...!

येऊ दे ना गं सये
बहार तुझ्या शब्दांचा
नको राहूस अबोल
आता तरी बोल ना..!

आता तरी बोल ना..!

.....सई(सुप्रिया पाटील)

"इंतजार"

माझ्या मनाची आता
हीच गत आहे...
तुला आठवण म्हणजे
माझ्यासाठी व्रत आहे...

सारखं मन वाहवत जात
तुझ्या आठवांच्या देशी..
कितीही थांबवावं म्हटलं
तरी थांबत नाही मजपाशी....

आता हा विरह हा
नकोसा झालाय मलाही...
भेटण्यासाठीचा "इंतजार"
करवत नाहीये ना तुलाही???

माझ्या मनाचा रस्ता अरे,
कधीच तुझ्या दिलाच्या दिशेने वळलायं..
मलाही आता,
तुझा "इंतजार" चांगलाच कळलायं...

....सई(सुप्रिया पाटील)

Tuesday, December 2, 2008

स्वप्न..

आपल्या स्वप्नांना
वाट मिळालीच नाही.....
विरहाच्या या रातीची
पहाट कधी झालीच नाही....
आजही लाटच आहे मी...
फ़रक इतकाच.....
पुर्वी येऊन भेटायचे तुला...
अन आता किनाराच
वेगळा लाभलाय मला....
पण अजुनही तुच आठवतोस...
कुठतरी खोलवर वादळ होऊन धुमसतोस....
पौर्णिमेचा चंद्र पाहताना...
रातराणी धुंद बहरताना...
वळवाच्या पावसात भिजताना....
अजुनही तुझी आठवण येतेच....
तुही अजुन विसरला नाहीस ना मला..?
माहीतेय....त्याच क्षणात अडकलायसं....
बांधुन ठेवल्यासारखा.....की बांधुन घेतल्यासारखा..?

....सई

हुंकार

प्रत्येक वेळी तु दिसलास की,
मनातलं वादळ अजुन जोरात उठतं...
कुठतरी थोडी शांत झालेल्या मला
पुन्हा उद्धवस्त करुन सोडतं.....
खुप वाट पाहीली होती तुझी....
तु दुरदेशी जाताना विचारलही होतं...
"माझ्यासाठी परत माझाच होण्यासाठी येशील ना?"
तेव्हाही फ़क्त "हुं" असच केल होतस...
मी त्यावरही विश्वास ठेवला होता....
वाट बघत बसले तुझी....पण...
तु आलास तेही लग्न करुन....
सहचारीणी सोबत....मला विसरुन...
इतके मोठे प्रश्न निर्माण झाले होते का रे?
इतकी वादळं आली होती का?
की ज्यासमोर माझा जराही विचार आला नाही मनात...
घरच्यांचा निर्णयही हुंकारावरच निभावुन नेला असशील ना?
पण तुझ्या त्या शांततेमुळे माझ्यावर आलेल्या वादळाचं काय??

...सई(सुप्रिया पाटील)