Sunday, November 15, 2009

भावनाशुन्य

कधीतरी शुन्यात जातं मन....अगदीच काही न केल्यामुळे...नाहीतर खुप काही केल्यामुळे....


मनात खोल खोल
दडलयं काहीतरी...
विचारांची रिघ
लागलीये कुठवरी....
खुप काहीतरी
करावस वाटणं..
काहीच न करता
रिकामं बसणं..
मोकळ्या आकाशातही
का जीव गुदमरतोयं...
स्वप्न सजवताना
का मन घाबरतयं...
का मन अस्स देतयं भुल..
की आहे ही......
शुन्यात जमा होण्यची चाहुल.....

....सई


*********************************

आज खोल आत
स्वतःला शोधताना
माझ्यातली "मी" मला गवसतच नाहीये...
हरवलीये मी कुठतरी...
खरच हरवले असेन का?
की लपुन बसली असेन
माझ्यातली मी....
माझ्यातच....
भावनांची रांगोळी झालीये
सगळे रंग एकत्र मिसळलेत
वरवर सगळं रंगीत वाटतयं..
पण...
सुखोत्सव असो
वा दुखःची वरात...
काहीच वाटत नाही...
भावनाशुन्य होण्याची
हिच लक्षणं आहेत का?..

....सई

********************************

वास्तवाची जाणीव
घेऊन जगतेयं खरी...
पण भावनांची उणीव
मात्र भासतेय कुठेतरी ...
उणईव नसेल ती
कारण......
वास्तवाशी खेळताना...
यांत्रिकपणे जगताना...
भावनाही गुदमरुन
मेल्या असाव्यात कदाचित...
खरच मेल्या असाव्यात का भावना...
ओलावाच जाणवत नाहीये कुठे...
अगदी खोल मनात गेलं तरी....

....सई

Saturday, August 15, 2009

तुझी आठवण

अनामिक ओढ
नीरव अशा सांजवेळी,
श्वासा-श्वासासोबत
तुझेच नाव...
मनाला लागलेली
वेडी हुरहुर...
सहनतेच्या पलिकडे
जाऊन वाट बघणार...
पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच
धाव घेणारं...
माझ्याही ताब्य़ात न राहीलेलं..
माझ्यापासुन दुर होऊन
केव्हाचच तुझ झालेलं
आणि आता विरहात,
रडणारं....
अबोलीच फ़ुल झालेलं..
एककी झालेल माझ मन....
याच एका प्रश्नात,
"तुलाही येत असेल रे माझी इतकीच आठवण???"

...सई

Sunday, August 9, 2009

ये दिल always मांगे more...!!!

सार काही वेळेवर,सुखदायक काय म्हणतात ते without tension होत असतानाही...मनाला गप्प अस बसवतच नाही.उधाणलेलंच असत सतत....सारं काही ठीक चाललेल असताना उगाच घोडे उधळावेत तसेच हे स्वप्नांचे ताशेरे उधळतं...गुरफ़टण्याची हौस उगाचची लागलेली असते अन त्यामुळेच साध सरळ चाललेल आयुष्य उगाच complicated होऊन बसतं,कुठतरी कळत असत नाही जे वागतोय ते चुकीच आहे पण नाही...मनाला हे सार कळत पण वळत मात्र नाही.आणि म्हणुनच चांदण्यांनी भरलेल आभाळ असुनही ते रितच भासत राहत...आणि ते भरण्याचा उगाचचा प्रयत्न चाललेला असतो...ये दिल ना always want more यार...!!!

जे काही जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त हवं असतं,मग जवळ असलेलं पुरेस का असेना.एखादी गोष्ट पुर्ण आपल्याकडे असताना काहीच अडत नसतानाही अजुन चांगलच का हव असतं...याच शोधात भरकटत मन सतत...सतत मृगजळाच्या मागे धावण्यात काय मजा येते देव जाणे.

कधी कधी तर आपल्याला हवी असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणार नाही हे माहीत असुनही त्याच गोष्टीचा विचार करत मन उगाच गुंतत जात.आणि मग नाही मिळाली ती गोष्ट की उगाचच कुढत बसतं.

नात्यांचही तसच आहे,समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही अस आपण नेहमीच म्हणतो पण,ती व्यक्ती कितीही चांगलं वागली तरी आपल्याला काहीतरी जास्तच हवं असतं.यातुनच मग अबोला,रुसवे,भांडणं आणि तंटे हा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवताना पुन्हा आपलीच ओढाताण होते.

एखादा आभाळाएवढं प्रेम देणारा जरी असेल ना तरी प्रेम घेणार्या व्यक्तीला ते आभाळापेक्षा तसुभर का होईना पण जास्तच हव असतं,या मनाला नेहमी आहे त्यापेक्षा काहीतरी जास्तच हव असतं.

नसीब से ज्यादा और वक्त से पहले
कुछ हासिल तो नही होगा
ये मालुम होके भी..क्यु??
ये दिल always मांगे more...!!!

Thursday, July 2, 2009

पत्रास कारण की,

"सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"असा प्रियचा प्रश्न ऎकुन सखी थोडी चकीतच झाली...याला काय झालं मधेच असा भाव तिच्या चेहर्‍यावर आला...आता हे भाव त्याला दिसत नव्हतेच कारण नेहमीप्रमाणे संभाषण फ़ोनवर सुरु होतं.....तिनं त्यावेळी तो विषय टाळला...पण नंतर ऑफ़िसवरुन घरी आल्यावर थोडा निवांत तिनही त्याच्या त्या प्रश्नावर विचार करायला सुरुवात केली...आणि उत्तराखातर प्रियला पत्र लिहायला घेतलं.

प्रिय,
कसा आहेस?सहजच वाटलं पत्र लिहावसं....आता म्हणशील रोज तर बोलतो फ़ोनवर मग मधेच पत्र लिहीण्याची लहर(सवड) कशी काय मिळाली बुआ....असो....रोज कितीही बोललो म्हणजे मला मान्य आहे हल्ली आपण पुर्वीसारखं बोलत नाही तरीही.....काही गोष्टी बोलुन सांगण्यापेक्षा मला वाटलं आज पत्रातुन व्यक्त व्हावं...त्यामुळे आता आश्चर्याचे भाव ओसरू द्यावेत अन थोडं नॉर्मल होऊन पत्र वाचवं....

तर पत्र लिहीण्यास कारण की,
आज तुम्ही बोलता बोलता एक प्रश्न विचारलात की,""सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"तेव्हाचा माझा चेहरा बघितला असतास ना तर तुलाही माझे ते भाव कळले नसते...असा का प्रश्न तुला पडावा रे?

Practically ह्या प्रश्नाच उत्तर द्यायचं म्हटलं ना तर मला सरळ वाटतं की,ह्या जगात कुणीही परिपुर्ण नसतो,तसच कुणाचाही जोडीदार हा त्याला १०० टक्के अनुरुप कसा मिळू शकतो,एकात जे कमी आहे ते दुसर्‍याने पुर्ण करायच असतं तरच ते नातं परिपुर्ण होऊ शकतं.माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा तु आहेस कधी कधी या गोष्टीचा आपल्या दोघांनाही त्रास होतो पण,माझ्यात जे नाही ते मला तुझ्यात सापडलं किंवा तुझ्यात जे नाही ते तु माझ्यात शोधतोस आणि आपलं नात फ़ुलवतोस परिपुर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे महत्वाच नाही का? आणि खरं सांगायच तर तुला कुणी परी जरी मिळाली आणि मला कुणी "परा" मिळाला ना तरी तिथही वाद,भांडणं होतच राहणार coz nobody is perfect.

मला कधी असा प्रश्नच पडला नाही कारण तुझं माझ्यावरच असलेलं प्रेम,तुझं मला समजुन घेणं...माझ्या चिडण्याला,माझ्या रागवण्याला bare करणं....jokes apart.....पण खरचं तुझ्यापेक्षा चांगला कुणी मला भेटला असता की नाही देव जाणे पण देवाने माझ्यासाठी उत्कृष्ट असा तुच पाठवला आहेस.(कारण माझी बडबड,चिडचिड तुझ्या व्यतिरिक्त कुणीच सहन करु शकत नाही.)

काळजी घ्यावी...नेहमीप्रमाणे खुप आठवण येतेय तुझी....लव्ह यु....

तुझ्या माझ्या नात्याला, नाही अंतराची बंधनं
नाही दुराव्याचे दुःख...नको स्पर्शाची आस...
नाही झाला संवाद जरी,तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "सय", जुळलीये आपल्यात,
म्हणुनच श्वासागणिक, येते तुझी आठवण....
अन करते मनात...तुझी तुझीच साठवण....

तुझीच वेडी,
सखी.

Sunday, June 21, 2009

पावसाचे आगमन

भरुन आलेलं आभाळ
गारठुन गेलेलं वारं
रिमझिम सरीतुन
"त्याच" हळुच येणं...

चातक होऊन
त्याची वाट पाहीलेली
येण्याने त्याच्या
सारी धरा न्हाहलेली...

उशीरा का होईना
पावसाचे झाले आगमन
त्याच्या येण्यान अशा
चिंब चिंब माझ मन...

.....सई

Sunday, June 7, 2009

"फ़िलहाल जी लेने दे"

हातातुन निसटावी वाळू,
तसे हे कडु-गोड क्षण निसटतायतं...
कुठले जपुन ठेवायचे,
अन कुठले खोडायचे,
याचे हिशोब मांडायलाही,
क्षण अपुरे पडतायत....
धावपळीच्या या आयुष्यात,
काय जगायच...कस्स जगायचं....
हेही वेळ बघुन आपण ठरवतोयं....
व्यवहारी या जगण्यात,
येणारा प्रत्येक क्षण निघुन जातोय....
आपण मात्र तस्सच "मोनोटोनस" जीवन जगतोय.....
उद्या जुनं आठवायला काहीच उरणार नाही....
कुणी विचारलं "काय जगलातं???"...
तर काय उत्तर असणार आहे आपल्याकडे.....
होईल ते होईल पुढे त्यासाठी आज का मरत जगा.....
मी तर आता येणारा प्रत्येक क्षण
मनभरुन आपलासा करुन जगावं म्हणतेय.....
कुणी अडवलं अस जगताना तर आशाताई सारखं म्हणेन....
"ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे"

....सई

Monday, March 16, 2009

नव्याने गवसलेली सखी....

आज सकाळी ऊठायची ईच्छाच नव्हती सखीची. तशी ती रोज दीपच्या नंतरच ऑफ़िसला जाते. त्याच आवरुन दिलं की स्वतःची तयारी करते.
कालच पुण्याला जाऊन आल्यामुळे अंगातला प्रवासाचा शीण तिला जाणवतच होता.कसं असतं ना...मनसोक्त हिंडण्याची हौस असते, ती पुर्णही करतो आपण. पण थकल्याची जाणीव होते अंथरुणावर पडल्यावरच.तिचंही तसंच झालं.
एकटीच गेली होती काल पुण्याला कवितांच्या कार्यक्रमासाठी. त्याला मुंबईतच काही कामं असल्यामुळे तो येऊ शकला नव्हता.
सकाळी उठताना त्यानं एकदाच तिला विचारलं...."काय गं आज जायचं नाही का?"
"तु आवर मी उठतेच" असं म्हणुन ती पुन्हा झोपी गेली.
त्यानं स्वतःच आवरुन घेतलं. चहा बनवला,ब्रेड टोस्ट करुन खाल्ले.
पुन्हा निघताना तिला उठवलं म्हणाला...."अगं उठ ना. जा ऑफ़िसला".
ती उठली खरी, पण ऑफ़िसला जाऊन पुन्हा यांत्रिक होण्याचा तिचा काही एक मूड नव्हता.
ती "बरं.." म्हणुन उठली त्याला बाय केलं आणि ऑफ़िसला फ़ोन करुन "बरं नाहीये. मी आज आँफ़िसला येत नाही" अस कळवलं.
कधी नव्हे ते इतकी निवांत सकाळ तिला मिळाली होती. सकाळचं आवरुन मस्तपैकी चहा गरम केला. आज बर्‍याच दिवसातनं त्याच्या हातचा आयता चहा ती घेणार होती. चहा ब्रेड खात पेपर वाचला. घर आवरलं मस्तपैकी सी डी प्लेअर वर आवडीची गाणी लावुन घर आवरायला घेतलं. तेवढ्यात मोबाईलवर "मेरी दुनिया है तुझमे कही.." हे गाणं वाजल त्याच्या फ़ोनसाठी ठेवलेली खास ट्युन. फ़ोन उचलला. मागे वाजत असलेल्या आवडीच्या गाण्यावरुन त्यानं ओळखलं की आज ही गेलीच नाही ऑफ़िसला.
"काय राणीसरकार आज नाही गेलात...आम्हांला तरी सांगायचं आम्हीही दांडी मारुन राहीलो असतो तुम्हांला सोबत म्हणुन"
ती: "अहो साहेब ऑफ़िसात आहात ना?जरा तरी लाज धरा."
तो: "लाज का बायकोशीच बोलतोय मी. तेही स्वतःच्या" असं म्हणुन दोघहि हसायला लागली.
ती: "बाय द वे, तुला दांडी मारायला सांगुन तु थोडीच घरी राहणार होतास. आजच्या मिटींगसाठी म्हणुनच काल आला नाहीस माझ्या सोबत.."
तो: "बरं बरं. करा आराम चल ठेवतो बाय. लव यु"
ती: "लव यु. काळजी घे"
तिनं फ़ोन ठेवला. आंघोळ वैगेरे करुन स्वतःपुरत खायला बनवलं. थोडा वेळ टीव्ही बघितला. मग ऑनलाईन जाऊन कम्युनिटिवर थोड्याफ़ार कविता वाचल्या. स्वतःही एक कविता लिहुन त्याला मेल केली.

मन एक रानफ़ुल
एकटच डोलणारं
पडते त्याला भुल
मन मायेत झुलणारं...

मन वैशाख वणवा
कैफ़ाच्या काही क्षणी
मन वसंत हिरवा
बहरतो पानोपानी...

मन स्वप्नाचा गाव
दाटणारा नयनात
भाव ओघळतो कधी
अश्रुच्याही रुपात...

कविता वाचुन लगेच रिप्लाय मेल आला त्यानंही चारोळी लिहुन पाठवली.

मन नाजुक गं सये
अगदी तुझ्यासारखं
मना लागे तुझी ओढ
होते प्रेमास पारखं...

"वेडाच आहेस" असा मोबाईलवरुन त्यानं तिला sms केला. दुपारी त्याचा फ़ोन आला "आता झोपते. संध्याकाळी लवकर ये" असं म्हणुन ती झोपली.
वाजता उठून चहा बनवला. चहा घेत घेत टिव्ही बघत बसली.
खुप फ़्रेश वाटत होतं तिला आज. खरच किती यांत्रिकपणा येतो जगण्यात रोज ऑफ़िसला जा कामाचे रगाडे उपसा. घरी येऊन घरही आवरा आणि जेवण बनवा आणि झोपुन जा. कंटाळा येतो अस "मोनोटोनस" होऊन जगण्याचा.
आज बर्याच दिवसांनी ती अशी दुपारी झोपली होती मनासारखी वागली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकली होती.
विचारातुन बाहेर आली तेही मोबाईलवर sms आल्यावर.
घरातला केर काढला तयारी केली अन बाजारात गेली.
भाज्या घेतल्या. त्याच्या आवडीची मेथीची भाजी घेतली. सुगंधी उदबत्त्यांचा पुडा आणि थोड्या मॉडर्न अशा छोट्या मेणबत्त्या घेतल्या. मोगर्याचे चार गजरे घेतले एक छोटासा चॉकलेट केक घेऊन घरी आली.
तसा तिला मेथीची भाजी खुडायचा जाम कंटाळा पण आज मुडच वेगळा होता. तिनं भाजी खुडली मस्तपैकी बनवली,चपात्या केल्या,भात डाळ लावला. थोड्या वेळाने डाळ फ़ोडणी घातली,पापड तळुन ठेवले .३० वाजत आले होते इतक्यात तो येईलच.
किचन आवरुन घेतलं. केर काढला. छान साडी नेसली. कधी नव्हे तो गजरा लावला. डायनिंग टेबलवर सगळ जेवणं नीट सजवुन ठेवलं आणि एका काचेच्या बाऊलमधे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. भरपुर उदबत्त्या लावल्या नेहमी एअर फ़्रेशनर ने सुगंधी होणारं घर आज उदबत्त्या आणि तिच्या केसातल्या गजर्यामुळे सुगंधी झालं होत. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या बाऊलमधे तिन एक मेणबत्ती तरंगत ठेवली आणि इतर मेणबत्त्या टेबलावर लावल्या.
दारावरची बेल वाजली अन तो आला. घरात झालेला अंधार बघुन तसा थोडा घाबरला. तितक्यात तिनं आवाज दिला, "आलास ना? थकला असशील. जा आवरुन घे जेवण तयार आहे".
घरातलं वातावरण बघुन, नाही.. अनुभवुन त्याला कळालं स्वारी आज काही तरी वेगळ्याच मुडमधे आहे ते. त्याला ह्या वातावरणाला खरं तर तिला फ़क्त अनुभवायच होत. काहीही बोलता तो फ़्रेश झाला आणि जेवायला बसला तिने पानं घेतली.
व्यवस्थित जेवण वाढलं. तो तिच्याकडे फ़क्त बघत होता.
ती: "काय बघतयोस?"
तो: "काही नाही. आज काय विशेष आहे याचा विचार करतोय"
ती: "माझ्यासाठी तसं आहेच. सांगु?"
तो: "सांग ना राणी"
ती: "ईतके दिवस यांत्रिक झालेली मी, मला जुनीच पण नव्याने गवसलीये रे. खरंच यासाठीच आज हा महोत्सव".
त्यातं काही बोलता तिला मिठित घेतलं आणि एखाद्या निरागस बाळाच्या कपाळावर ओठ टेकतात तसे तिच्या कपाळावर टेकले.
त्यानंतर दोघांनीही जेवुन घेतलं.
तो: "चल ना आईस्क्रिम खायला जाऊयात"
ती: "मज्जा! चल ना"
त्यानं खाली जाऊन पार्कींग मधली गाडी काढली. ती दोघंही गाडीत बसली. त्यानं तिच्या आवडीच "चांदण्यात फ़िरताना " हे गाणं लावलं. आज ती दोघंही मौनातुनच एकमेकांना अनुभवत होती.
जुहु ला नेऊन त्यानं गाडी थांबवली. बीचवर जाण्याआधी Naturals मधुन आईस्क्रिम घेतलं. गाडी पार्क करुन वाळुवर बसुन त्या दोघांनी ते संपवलं आणि मग हातात हात गुंफ़ुन चांदण्याचा सडा असलेल्या आकाशाकडे पाहत बसले शांत.तृप्त,निवांत.
तेवढ्यात सखीला कुणीतरी जोरात हलवले..."झोपेत हसतेस काय गालातल्या गालात? ऊठ....सकाळचे वाजलेत."
आयला स्वप्न होतं तर हे असं स्वतःशी म्हणत लगेच फ़ोन करुन दीपला सांगितलं....आणि नेहमीप्रमाणे त्याने तिला अक्षरश: वेड्यात काढलं.

Saturday, March 14, 2009

शोध मनाचा...

मन का?...
अगाध कोडं आहे मन
कधीही न उलगडणारं...
असुनही प्रत्येकाकडे
कधीही न सापडणारं..
मन असं मन तसं
असच मानत रहायचं...
पण नक्की मन कुणासारखं,
असत कुठं लपलेलं...
हे गुढ सतत उलगडत बसायचं...
मनाचा गुंता मनानेच सोडवायचा
त्याच गुंत्यात मनाला गुंतवायचं...
मनाच्या शोधात मनाशीच भांडायचं
मनावरच उगा रुसुन बसायच...
भाडलं काय नि रुसलं काय?
मन थोडीच कळलयं कुणाला....
नाही सापडणार शोधुन हे
थोडीच वळलयं कुणाला...
तरिही घेतोच आपण
शोध मनाचा....कधीही न संपणारा....

...सई(सुप्रिया पाटील)

आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःख मनातलं....मनातच ठेवणं...
त्यावर सुखाच....पांघरुण घालणं...
असच गं सखे....आपलं झुरणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

भरारी घेताना...दिशा शोधणं...
अडखळलो तरी...क्षितिज गाठणं...
असच गं सखे...सारं जुळवणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःखावर सखे....सुख गोंदणं...
आकाशी इवल्या...पसरावं चांदणं ....
हाच विचार...सतत जगणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

....सई(सुप्रिया पाटील)

[मुळ कविता-चैताली आहेर http://chaitalikavita.blogspot.com/2009/01/blog-post_23.html--या कवितेला रिप्लाय म्हणुन मी ही कविता लिहीली.]

प्रकाश..

वृत्त-ओवी

प्रकाशाची भिती
का गं सखे मनी
दिशेची शाश्वती
प्रकाशात...!

अंधारात असे
गुढतेची साथ
सोड उगा यत्न
गुंतण्याचा...!

अंधारात साथ
फ़क्त एकांताची
नसे सावालीही
सोबतीला...!

प्रकाश किरणे
ओढुन घे सखे
दिशा गं प्रत्येक
सापडेल...!

धडपडण्याची
असे सदा भिती
निराधार वाटे
अंधारात...!

उजेडात जरी
नसला साथी
आधार असतो
प्रकाशाचा...!

...सई(सुप्रिया पाटील)