Monday, March 16, 2009

नव्याने गवसलेली सखी....

आज सकाळी ऊठायची ईच्छाच नव्हती सखीची. तशी ती रोज दीपच्या नंतरच ऑफ़िसला जाते. त्याच आवरुन दिलं की स्वतःची तयारी करते.
कालच पुण्याला जाऊन आल्यामुळे अंगातला प्रवासाचा शीण तिला जाणवतच होता.कसं असतं ना...मनसोक्त हिंडण्याची हौस असते, ती पुर्णही करतो आपण. पण थकल्याची जाणीव होते अंथरुणावर पडल्यावरच.तिचंही तसंच झालं.
एकटीच गेली होती काल पुण्याला कवितांच्या कार्यक्रमासाठी. त्याला मुंबईतच काही कामं असल्यामुळे तो येऊ शकला नव्हता.
सकाळी उठताना त्यानं एकदाच तिला विचारलं...."काय गं आज जायचं नाही का?"
"तु आवर मी उठतेच" असं म्हणुन ती पुन्हा झोपी गेली.
त्यानं स्वतःच आवरुन घेतलं. चहा बनवला,ब्रेड टोस्ट करुन खाल्ले.
पुन्हा निघताना तिला उठवलं म्हणाला...."अगं उठ ना. जा ऑफ़िसला".
ती उठली खरी, पण ऑफ़िसला जाऊन पुन्हा यांत्रिक होण्याचा तिचा काही एक मूड नव्हता.
ती "बरं.." म्हणुन उठली त्याला बाय केलं आणि ऑफ़िसला फ़ोन करुन "बरं नाहीये. मी आज आँफ़िसला येत नाही" अस कळवलं.
कधी नव्हे ते इतकी निवांत सकाळ तिला मिळाली होती. सकाळचं आवरुन मस्तपैकी चहा गरम केला. आज बर्‍याच दिवसातनं त्याच्या हातचा आयता चहा ती घेणार होती. चहा ब्रेड खात पेपर वाचला. घर आवरलं मस्तपैकी सी डी प्लेअर वर आवडीची गाणी लावुन घर आवरायला घेतलं. तेवढ्यात मोबाईलवर "मेरी दुनिया है तुझमे कही.." हे गाणं वाजल त्याच्या फ़ोनसाठी ठेवलेली खास ट्युन. फ़ोन उचलला. मागे वाजत असलेल्या आवडीच्या गाण्यावरुन त्यानं ओळखलं की आज ही गेलीच नाही ऑफ़िसला.
"काय राणीसरकार आज नाही गेलात...आम्हांला तरी सांगायचं आम्हीही दांडी मारुन राहीलो असतो तुम्हांला सोबत म्हणुन"
ती: "अहो साहेब ऑफ़िसात आहात ना?जरा तरी लाज धरा."
तो: "लाज का बायकोशीच बोलतोय मी. तेही स्वतःच्या" असं म्हणुन दोघहि हसायला लागली.
ती: "बाय द वे, तुला दांडी मारायला सांगुन तु थोडीच घरी राहणार होतास. आजच्या मिटींगसाठी म्हणुनच काल आला नाहीस माझ्या सोबत.."
तो: "बरं बरं. करा आराम चल ठेवतो बाय. लव यु"
ती: "लव यु. काळजी घे"
तिनं फ़ोन ठेवला. आंघोळ वैगेरे करुन स्वतःपुरत खायला बनवलं. थोडा वेळ टीव्ही बघितला. मग ऑनलाईन जाऊन कम्युनिटिवर थोड्याफ़ार कविता वाचल्या. स्वतःही एक कविता लिहुन त्याला मेल केली.

मन एक रानफ़ुल
एकटच डोलणारं
पडते त्याला भुल
मन मायेत झुलणारं...

मन वैशाख वणवा
कैफ़ाच्या काही क्षणी
मन वसंत हिरवा
बहरतो पानोपानी...

मन स्वप्नाचा गाव
दाटणारा नयनात
भाव ओघळतो कधी
अश्रुच्याही रुपात...

कविता वाचुन लगेच रिप्लाय मेल आला त्यानंही चारोळी लिहुन पाठवली.

मन नाजुक गं सये
अगदी तुझ्यासारखं
मना लागे तुझी ओढ
होते प्रेमास पारखं...

"वेडाच आहेस" असा मोबाईलवरुन त्यानं तिला sms केला. दुपारी त्याचा फ़ोन आला "आता झोपते. संध्याकाळी लवकर ये" असं म्हणुन ती झोपली.
वाजता उठून चहा बनवला. चहा घेत घेत टिव्ही बघत बसली.
खुप फ़्रेश वाटत होतं तिला आज. खरच किती यांत्रिकपणा येतो जगण्यात रोज ऑफ़िसला जा कामाचे रगाडे उपसा. घरी येऊन घरही आवरा आणि जेवण बनवा आणि झोपुन जा. कंटाळा येतो अस "मोनोटोनस" होऊन जगण्याचा.
आज बर्याच दिवसांनी ती अशी दुपारी झोपली होती मनासारखी वागली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकली होती.
विचारातुन बाहेर आली तेही मोबाईलवर sms आल्यावर.
घरातला केर काढला तयारी केली अन बाजारात गेली.
भाज्या घेतल्या. त्याच्या आवडीची मेथीची भाजी घेतली. सुगंधी उदबत्त्यांचा पुडा आणि थोड्या मॉडर्न अशा छोट्या मेणबत्त्या घेतल्या. मोगर्याचे चार गजरे घेतले एक छोटासा चॉकलेट केक घेऊन घरी आली.
तसा तिला मेथीची भाजी खुडायचा जाम कंटाळा पण आज मुडच वेगळा होता. तिनं भाजी खुडली मस्तपैकी बनवली,चपात्या केल्या,भात डाळ लावला. थोड्या वेळाने डाळ फ़ोडणी घातली,पापड तळुन ठेवले .३० वाजत आले होते इतक्यात तो येईलच.
किचन आवरुन घेतलं. केर काढला. छान साडी नेसली. कधी नव्हे तो गजरा लावला. डायनिंग टेबलवर सगळ जेवणं नीट सजवुन ठेवलं आणि एका काचेच्या बाऊलमधे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. भरपुर उदबत्त्या लावल्या नेहमी एअर फ़्रेशनर ने सुगंधी होणारं घर आज उदबत्त्या आणि तिच्या केसातल्या गजर्यामुळे सुगंधी झालं होत. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या बाऊलमधे तिन एक मेणबत्ती तरंगत ठेवली आणि इतर मेणबत्त्या टेबलावर लावल्या.
दारावरची बेल वाजली अन तो आला. घरात झालेला अंधार बघुन तसा थोडा घाबरला. तितक्यात तिनं आवाज दिला, "आलास ना? थकला असशील. जा आवरुन घे जेवण तयार आहे".
घरातलं वातावरण बघुन, नाही.. अनुभवुन त्याला कळालं स्वारी आज काही तरी वेगळ्याच मुडमधे आहे ते. त्याला ह्या वातावरणाला खरं तर तिला फ़क्त अनुभवायच होत. काहीही बोलता तो फ़्रेश झाला आणि जेवायला बसला तिने पानं घेतली.
व्यवस्थित जेवण वाढलं. तो तिच्याकडे फ़क्त बघत होता.
ती: "काय बघतयोस?"
तो: "काही नाही. आज काय विशेष आहे याचा विचार करतोय"
ती: "माझ्यासाठी तसं आहेच. सांगु?"
तो: "सांग ना राणी"
ती: "ईतके दिवस यांत्रिक झालेली मी, मला जुनीच पण नव्याने गवसलीये रे. खरंच यासाठीच आज हा महोत्सव".
त्यातं काही बोलता तिला मिठित घेतलं आणि एखाद्या निरागस बाळाच्या कपाळावर ओठ टेकतात तसे तिच्या कपाळावर टेकले.
त्यानंतर दोघांनीही जेवुन घेतलं.
तो: "चल ना आईस्क्रिम खायला जाऊयात"
ती: "मज्जा! चल ना"
त्यानं खाली जाऊन पार्कींग मधली गाडी काढली. ती दोघंही गाडीत बसली. त्यानं तिच्या आवडीच "चांदण्यात फ़िरताना " हे गाणं लावलं. आज ती दोघंही मौनातुनच एकमेकांना अनुभवत होती.
जुहु ला नेऊन त्यानं गाडी थांबवली. बीचवर जाण्याआधी Naturals मधुन आईस्क्रिम घेतलं. गाडी पार्क करुन वाळुवर बसुन त्या दोघांनी ते संपवलं आणि मग हातात हात गुंफ़ुन चांदण्याचा सडा असलेल्या आकाशाकडे पाहत बसले शांत.तृप्त,निवांत.
तेवढ्यात सखीला कुणीतरी जोरात हलवले..."झोपेत हसतेस काय गालातल्या गालात? ऊठ....सकाळचे वाजलेत."
आयला स्वप्न होतं तर हे असं स्वतःशी म्हणत लगेच फ़ोन करुन दीपला सांगितलं....आणि नेहमीप्रमाणे त्याने तिला अक्षरश: वेड्यात काढलं.

Saturday, March 14, 2009

शोध मनाचा...

मन का?...
अगाध कोडं आहे मन
कधीही न उलगडणारं...
असुनही प्रत्येकाकडे
कधीही न सापडणारं..
मन असं मन तसं
असच मानत रहायचं...
पण नक्की मन कुणासारखं,
असत कुठं लपलेलं...
हे गुढ सतत उलगडत बसायचं...
मनाचा गुंता मनानेच सोडवायचा
त्याच गुंत्यात मनाला गुंतवायचं...
मनाच्या शोधात मनाशीच भांडायचं
मनावरच उगा रुसुन बसायच...
भाडलं काय नि रुसलं काय?
मन थोडीच कळलयं कुणाला....
नाही सापडणार शोधुन हे
थोडीच वळलयं कुणाला...
तरिही घेतोच आपण
शोध मनाचा....कधीही न संपणारा....

...सई(सुप्रिया पाटील)

आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःख मनातलं....मनातच ठेवणं...
त्यावर सुखाच....पांघरुण घालणं...
असच गं सखे....आपलं झुरणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

भरारी घेताना...दिशा शोधणं...
अडखळलो तरी...क्षितिज गाठणं...
असच गं सखे...सारं जुळवणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

दुःखावर सखे....सुख गोंदणं...
आकाशी इवल्या...पसरावं चांदणं ....
हाच विचार...सतत जगणं...
आसूंच्या पल्याड..... देखणं हासणं.....|

....सई(सुप्रिया पाटील)

[मुळ कविता-चैताली आहेर http://chaitalikavita.blogspot.com/2009/01/blog-post_23.html--या कवितेला रिप्लाय म्हणुन मी ही कविता लिहीली.]

प्रकाश..

वृत्त-ओवी

प्रकाशाची भिती
का गं सखे मनी
दिशेची शाश्वती
प्रकाशात...!

अंधारात असे
गुढतेची साथ
सोड उगा यत्न
गुंतण्याचा...!

अंधारात साथ
फ़क्त एकांताची
नसे सावालीही
सोबतीला...!

प्रकाश किरणे
ओढुन घे सखे
दिशा गं प्रत्येक
सापडेल...!

धडपडण्याची
असे सदा भिती
निराधार वाटे
अंधारात...!

उजेडात जरी
नसला साथी
आधार असतो
प्रकाशाचा...!

...सई(सुप्रिया पाटील)