Wednesday, December 14, 2011

..मन..

काय असे ह्याचे रुप
असे कसा याचा रंग
माझ्या मनाचा कसा
सांगा ओळखावा ढंग?

मन अल्लड पाखरु
कधी नभात विहार
स्वैर बागडते कधी
साता सागराच्या पार..

मन फ़क्त शब्द शब्द
वाटे जगास कविता
भासे खळाळ खळाळ
जशी वाहते सरिता..

मन मल्हार होऊन
सुरातून बरसतं
कधी तरल अधीर
शब्दातून झिरपत..

मनी दाटते आभाळ
मन होतं नभापरी
कोसळते सांजवेळी
जसा ऋतु पावसाळी..

मन परके परके
कधी जगापसुन होते
मन पाचोळा हलके
आकाशात तरंगते..

मन गुंत्यात गुंतते
वेड्या मायेच्या आकाशी
होऊन शिकार मायेचे
होते एक बंदिस्त पक्षी...

असं कसं मन माझं
माझं मला समजेना...
एक कोडं वाटे मन
त्याच गुज उमजेना...

....सई(सुप्रिया पाटील)

Friday, December 9, 2011

"सतरंगी"

तुझ प्रेम अनुभवताना,
तुझ्या कुशीत निजताना...
तुझ्या स्पर्शात भिजताना...
रोमारोमात भिनते एक नशा....
गुंगत नाही त्यात मी....
विरघळत जाते....
एकरूप होते....
जेव्हा चांदण नदीला स्पर्शते ...
त्या शीतल स्पर्शाने मोहरून....
तरंग उठतात पाण्यावर...विरघळलेल्या चांदण्याने ,
जणू स्पर्शाचे नवे अर्थच उमजतात चांदणस्पर्श गोंदल्याने....
तसच काहीस होत माझ....
तस्सेच रोमांच उठतात प्रत्येक रेणुवर....
हरवून जाते मी....
रंगून जाते तुझ्याच रंगात.....
अन् होते सतरंगी....

...सई

Tuesday, November 8, 2011

"आठवांचा आकांत"

आठवणीतले काही क्षण,
पसरलेले असतात असेकाही मनभर...
कितीही पुसायचे म्हटले तरी...
भेटतातच कधीतरी...
कुठल्यशा वळणावर....
विसरायला लावतात...
आपलेच अस्तित्व...
मनातला रंग वेगळाच होतो...
काहीतरी दाटुन येत गहिर...गडद....
विरून जातो आपणही...त्या रंगात....
कसलच भान राहत नाही....
मौन पांघरून स्तब्ध होतो आपण...
असे जसे..कधी काही बोललोच नाही....
निःशब्दाच्या जगात पोहचतो....
श्रांत...निवांत...एकांतात....
मनात इतका आठवांचा आकांत उधाणलेला असताना..

...सई

Thursday, October 13, 2011

थोडी ऊन्हं उधार मिळतील का?

आज सकाळी घराबाहेर निघाल्यावर थोडा गारठा जाणवला.थोडे ढग पण भरुन आल्यासरखे दिसले. बसस्टॉपवर आल्यावर संपुर्ण आकाश पाहिलं तर मी जाणार त्या दिशेने आकाश जरा जास्तच काळवंडत गेल होतं. खुप जोरात पाऊस येणार हे मला उमजलं. बँगलोरच्या वातावरणाबद्दल खरंच शंकाच येते मला. आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा भर उन्हाळा होता पण तेव्हाही इथे पाऊसच सुरु होता . सतत ढगाळलेलं वातावरण.

उन्हाळ्यात पाऊस,पावसाळ्यात पाऊस,
पावसाने आता अजुनच गारठला हिवाळा...
बँगलोरमधे एकच ऋतू तो म्हणजे पावसाळा...

हे तस्स मला आता कळुन चुकलय ....
आजही खुप सारे भरुन आलेले ढग, रिमझिम पाऊस, बसच्या खिडकीवरुन ओघळणारे थेंब आणि कानात वाजणारी संदिप खरेची गाणी. कुणा प्रियकर-प्रेयसीला "विरहात" असताना हवहवसं वाटेल अगदी तसंच वातावरण.... पण आता मी विरहात नाही....अशा वातावरणाचा मला काय उपयोग??आणि तसही मला ऊन पाऊस आणि थंडी यांच्यापेक्षा ज़रा जास्तच आवडत ...सख्या ला कधी म्हटल मी की, "आज काय मस्त ऊन पडलय" तर त्याच एकच उत्तर..."तुला एखाद्या दिवशी उन्हात दोरीवर वाळत टाकतो,मग खा हव तेवढ ऊन " ऊन हा प्रकार मला इथे जास्त जाणवलाच नाही. आता आठवतात मी मुंबईत असताना सुर्य उगवल्याबरोबर माझ्या बेडरुमच्या खिडकीतून आत येणारी किरणं. तेव्हा सकाळच्या सुर्याचा राग यायचा कारण अगदी त्याने उगावल्याबरोबराच मलाही प्रकाशावं लागायचं. पण आता तर कुणी ऊन्हं उधार दिली तर बर होइल ....ती मागावीशी वाटतात....
"रुणझूणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा,
थोडी ऊन्हं तिथून आणून, त्याचा वर्षाव इथे करा."

..सई

Thursday, September 29, 2011

पुन्हा नव्याने ...

चालता चालता अचानक
रोजच दिसणार्‍या ....पण अचानक वेगळ्या भासणार्‍या
बर्‍याच गोष्टी डोळ्यासमोरून जातात...
तोच तो रस्ता....तीच वळणे
रोजचच असलेलं सारं
पण अचानक जाणवू लागतात कितीतरी बदल...
बदल होतच असतात खरतर...
आपलं लक्ष नसत गेलेलं इतकच....
:
:
एखाद्या अशाच ओळखीच्या वळणावर,
थांबून थोडा विचार करावा कधीतरी
त्या वळणाशी जोडलेल्या आठवणींना
पुन्हा उजाळा द्यावा....
नाही...नाही .....
उलट पुन्हा त्याच क्षणात जाऊन
त्यांच्यातच स्वतःला गुरफटुन....
त्यात थोडासा बदल करून...
मुठीत बंद करून टाकावेत असे काही क्षण...
असाच खोल काहीतरी वाटत कधीतरी...
अशीच उलटुन गेलेली आयुष्याची कित्येक पाने
पुन्हा उलटून.....
तेच क्षण जगु वाटतात पुन्हा नव्याने...

..सई

Wednesday, August 10, 2011

तुझ माझ नातं...

तुझ माझ नातं कसं...
किनारा आणि लाटेसारखं आहे...
तू अगदीच लाटेसारखा..
मनात येईल तसा वागणारा...
कधी शांत...क्लांत युद्धासारखा
कधी खवळलेला...पेटल्या वणव्यासारखा....
आवेग व्यक्त करतोस...तेव्हा,
अगदीच उधाणालेला...
तर कधी मायेने मला,
कुशीत सामावून घेणारा...
एकदम संथपणे ....

आणि मी किनारा....
तू कसाही येत असलास तरी...
तुझ्या भेटीच्या,
मिठिच्या ओढीने,
तिथेच थांबलेली....
तुला बिलगायला आतुरलेली....

..सई

Monday, August 1, 2011

"अंतरे"

तुझ्या माझ्यातही आता...
कधीही न संपवता येणार अंतरच निर्माण झालाय...
मी सतत प्रयत्न करते ते अंतर कमी करण्याचा...
धावत राहते उगाचच तुझ्या आठवणींच्या मागे...
दुसरा पर्याय आहे का रे आता,
आठवणीं शिवाय?....तुलाही अन् मलाही...
पण नाहीच पोहचत तुझ्यापर्यन्त....
फसवीच खरी अंतरे....
:
:
:
पण,
"अंत" झाला आपला तरी.....
आपल्या दोघांच्याही "अंत:करणात" कधी...
"अंतरे" निर्माण होतील का?

...सई

Wednesday, July 13, 2011

पाऊस आणि आठवण...

पावसाळी

चिंब मन

ओलसर

आठवण...


मनातल्या

आभाळात

दाटलेली

आठवण...


आसवांची

वाट होते

बरसते

आठवण...


विरहात

आस देते

जलधार

आठवण...


चिंब ओल्या

चाँदराती

विझलेली

आठवण...

...सई

Tuesday, June 7, 2011

"सोनमोहर"

संध्याकाळी बाहेर पडल्यावर,
रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेला "सोनमोहर" नजरेत आला,
संपुर्ण सोनेरी झालेलं ते झाड...
अन खाली रस्त्यावर पडलेला त्याच्या पिवळाधम्मक सडा.....
चैत्रात असच होतं त्याच...दरवर्षीच....
पण यावर्षी बघितल्यावर तुच आठवलास....
चैत्रात फ़ुलणार्‍या सोनमोहरासोबत तुही ह्यावेळेस फ़ुलला होतास.....
मावळतीच्या उन्हात जसा तो अजुनच तेजाळलेला वाटतो...
तसा तुही आता वाटतोस...
त्याचा येणारा उबदार गंध तुझ्या श्वासांची आठवण देत होता....
पुर्वी अगदीच कोमेजला होतास...
अगदीच रखरखीत झाला होतास....
जसा सगळा बहर ओसरून गेलेला सोनमोहर...
तुझ्या तशा असण्याची आठवणही नकोशी होते.....
तस तुला ऊन आवडत नाहीच.....
सोनमोहरही नसेल आवडत....
पण मला मात्र तु हल्ली त्या सोनमोहरासारखाच भासतोस.....
प्रफ़ुल्लीत....
गंधाळलेला...
उबदार....

....सई

Thursday, February 24, 2011

"आठवण"

आजुबाजुला सारचं....
शांततेत ...अगदीच निस्तब्ध असताना.....
मनही नि:शब्द होऊन जातं....
बरच काही बोलायला असुनही,
काहीच सुचत नसल्यासारखं.....
यालाही कारण तूच आहेस....
तुझ्या आठवणीच याला जबाबदार....
ढगाळलेलं आकाश....
पावसाची सततची लागलेली रिघरिघ....
बाहेर दिसणारा काळोख....
अशावेळी.....अशावेळी,
खिडकीच्या थंड झालेल्या गजांनाही,
स्पर्श करावासा वाटत नाही.....
कारण,
तुझ्या आठवणींच्या जगात हरवलेल्या मला
त्या स्पर्शानं दचकुन जाग येईल याची भितीच वाटते....
तुझ्या आठवणींना कवटाळुन झोपी जावं
अन त्याच्यांच कुशीत जागही यावी ...
तु जवळ नसताना आठवणींचीच ऊब घ्यावी....

....सई