Thursday, January 19, 2012

"अव्यक्त भावना"

अगदीच काही मोकळ मोकळ नाही आभाळ मनाच
आहेत काहीशा चांदण्या...(अव्यक्त भावनाच कदाचित)
कुठतरी काहीतरी चुकल्यासारख वाटतंय..
घडी व्यवस्थित बसलीये तशी,
पण उगाच वाटतंय विसकटून जाईल ती..
तसं नाहीच विस्कटणार काही...
उगाच एखादी चुरगळ आलीये,
होत कधी कधी असंही...
व्यक्त नाही झालं कि होत असाव असं...
मी होते व्यक्त तुझ्याजवळ पूर्वीसारखीच अजूनही
पण तुझ्या मनाच आभाळ रीत झालंय का रे?
आठवतंय का तुला?
किती चालायचे पूर्वी शब्दांचे खेळ..
चिंब करत होतास तू  तुझ्या शब्दांनी...
तुझ्या मिठीत शिरून,
कित्येक पौर्णिमा अनुभवल्यात मी...
दाटलेल्या भावनांची अवसही.....
पुन्हा अनुभवायचं आहे मला,
तुझ्या मिठीतल चांदण...
तुझ दिलखुलास बरसण,
आणि  तुझे शब्द बरसल्यावर,
निरभ्र झालेलं तुझ्या मनाच आकाशही....

...सई

Monday, January 9, 2012

"चांदणस्पर्श"

मिठीत तुझिया येता अशी मी,
श्वासात होतो अत्तराचा दरवळ...
उसासे फुलतात असे काहीसे,
आवेग नसे तो...असे एक वादळ....

उधाणले वादळ क्षमवावे कसे,
पुरतील का त्याला स्पर्शाचे दिलासे..
स्पर्शातून चांदणे गोंदावे कसे,
सुगंधी रात करते त्याचे खुलासे ...

बावरते स्पर्शात..जणू बावरला गुलाब,
गंधाळते स्पर्शाने जणू फुलला पारिजात..
सोहळ्यात प्रेमाच्या सख्या चांदण्याची साथ,
सावरते बावरी काया तुझ्या चांदण स्पर्शात...

...सई

Wednesday, January 4, 2012

"नात्यांची वीण"

नात्यांची वीण.....?
जुन्याच  नात्यांना पुन्हा नव्याने उलगडताना,
कित्येक प्रश्नांना नव्याने समोर जात मन...
उरात दाटते  एक अनामिक  हुरहूर,
मनात नुसते प्रश्नांचे काहूर...
काही प्रश्न खूप जवळचे....ज्यांचे सुटले होते कोडे
काही प्रश्न नकोसे... अजूनही जे अनुत्तरीत
कुठला प्रवास असावा खरा....
नात्यांची वीण एकसंध असलेला की,
तुटून गाठ बसलेली नाती उलगडण्याचा ?
गाठ सुटली की सगळच मोकळं...पोकळी निर्माण झालेलं...
म्हणूनच कदाचित जपतो आपण त्या गाठी...
निरगाठी होईपर्यंत....
निरागाठींच असं सुरेख गुंतण....
त्यासोबत सुख-दुःखाचे आंदण...
आयुष्याच्या वस्त्राची अशीच असावी जरतारी गुंफण...

.....सई