Wednesday, April 18, 2012

"मुक्त"

रंगवणारा तो,
कुठलीही रंग"संगती" घडवतो.

हे रंग एकमेकांना भेटल्यावर,
स्वतःचे अस्तित्व बदलून
"स्व" संपूर्ण नष्ट होऊन
तयार होतो नवा "रंग"

वदतो तो बरंच काही...
पण सारकाही मौनात व्यक्त,
उरतात मागे,
काही आलेख...
काही खुणा...
आणि काही अवशेष फक्त....
ह्याच निःशब्दाची सीमा ओलांडून,
सुनसान वस्तीत वसलेल्या...
आवाजाचे पृथ्थकरण झाल्यावर,
उरतो एक वेगळाच "मंत्र"

त्याच्या ह्या अफाट संसारातलं,
माझ हे इवलंस अस्तित्व,
त्याने निर्मिलेल्या,
"त्या"वेगळ्या "रंगा"त,
रंगू पहातंय...
त्याने निर्मिलेला तो "मंत्र "
एकदा उच्चारून,
मुक्त होऊ पहातंय....
"माझं"
हे अस्तित्व
जे त्याचाच एक अंश आहे...

..सई

Sunday, April 8, 2012

"सावल्या"



धूसर होत चाललेल्या,
काही ओळखीच्या
काही अनोळखी...

कधी तृप्त
कधी अधाशी...

"सावल्या"

सांजेच्या कुशीतून
रातीच्या डोहात
शिरताना,
त्याही गुडूप झाल्या...
:
काळ्या कुट्ट
अंधाराच्या मिठीत
विरघळलंय आता अस्तित्व
:
पण त्या सावल्यांच्या
करड्या छटा...
त्यांच काय...?

ज्यांचा मन अजूनही घेतंय...
मागोवा...

...सई