Thursday, March 29, 2012

"एक प्रवास"

एक प्रवास
कधी बेफाम,उन्मत्त
हत्तीसारखा..

तर कधी,
आपल्याच कोशात गुरफटलेल्या
सुरवंटासारखा...

असा प्रवास ज्यात
नसतात सोबतीला
नकाशे दिशांचे
तरीही पावले
चालतच राहतात
घेत राहतात
वाऱ्यासोबत
आढावे त्याच दिशेचे
अनुमान घेते मन
अनवट वाटेचे
शून्यातून मार्ग काढताना
कधी कधी गोठते पायवाट....
मनाच्या पटलावर
कंप येतात भीतीचे
विळखा होतो वाऱ्याचा
आभाळही वाटत फाटल्यासारख
ओशाळून जातो जीव
काही पांथस्थ येतात सोबतीला
निघूनही जातात आल्यासारखे
तरी प्रवास थांबत नाही.

कारण ,
तो प्रवासच  असतो एकाकी
अंतरीचा स्वर परफेक्ट शोधण्याचा
विखुरलेल्या,
गोठलेल्या,
कंपलेल्या,
साऱ्या तारा छेडून,
"स्व" शोधण्याचा...

...सई

Thursday, March 15, 2012

"अनुबंध"

मनाच्या आकाशात
हसर चांदणं..
आसवात वाहत
नकोस दुखणं.
कितीही दुरावलो तरी
मनातली सय कायम
कित्येक हूळहूळणारे पाश
घेऊन रुजलेलं...
कित्येक नकोसे शाप
लागूनही तरलेलं...
भिनलोय जणू
एकमेकांच्या रंध्रात....
रक्त होऊन....
मनाच्या कॅनव्हास वर
उमटले आहेत प्रेमभाव
असे,
जसे,रंग उमटावेत..
कोऱ्या कागदावर
अन एक सुंदर चित्र घडावं 
शब्दांच्या पलीकडलं
हे नातं,
काहीस मोकळं
काहीस बेबंद....
जणू श्वासांनी
एकमेकांशी केलेला
एका गोड बंधनाचा
"अनुबंध"

....सई