Tuesday, February 9, 2010
प्रिय सखीस,
फ़ार पुर्वी कुठतरी वाचलं होत,की प्रेमात पडल्यावर मुलाच जग काहीच बदलत नाही,पण मुलीच सगळं जग त्या एका व्यक्तीबोवतीच गुरफ़टुन राहतं.....आज प्रकर्षानं हे खरच आहे अस जाणवलं......खरच किती बदलतो आपण प्रेमात पडल्यावर,आपला जोडीदार कितीही समजून घेणारा असला किंवा किती स्पेस देणारा असला तरीही....तरीही....बदल हे होतातच......
आज एक मुलगी म्हणुन हे सगळं जाणवतयं....मला त्याच्याशिवाय अस काही विश्वच उरलेलं नाही.....सगळ जग त्याच्याच अवतीभवती सामावलेलं आहे.....प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट करताना....काही करण्याच्या विचारही करताना पहीला विचार त्याचा येतो...त्याला काय वाटेल...नाहीतर तो काय म्हणेल.
तो मला खुप समजुन घेतो....मी त्याच्याशी सगळं शेअरही करते...पण कधी काही गोष्टी एखाद्या जवळच्या मित्राला वा मैत्रीणीला सांगाव्याशा वाटल्या तर मला तस कुणी उरलच नाहीये हे कळुन चुकतं....
प्रेमात पडल्यामूळे इतर नात्यांवर परिणाम का व्हावा हेच कळत नाही....पुर्वीसारखं मित्र-मैत्रीणींशी भेटणं होत नाही...त्यांच्याशी फ़ोनवर बोलणही होत नाही...इतक का विश्व तोकडं व्हावं....आणि हे सगळं आम्हा मुलींच्याच बाबतीत का बरे?????
याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबरोबर खुष नाहीये...पण माझी इतर नाती कुठतरी हरवलीयेत....असलेल्या नात्यांची वाढ कुठतरी खुंटलीये....इतकं माझ विश्व फ़क्त त्याच्याच साठी उरलयं.....
खुप खुप प्रेम करते मी त्याच्यावर...पण त्याच्या अशा दुर असल्यामुळे...आमच्या वेळा जुळत नसल्यामुळे मला जेव्हा अचानक व्यक्त व्हायच असतं किंवा कुठं भटकायला जायचा मुड असल्यावर ते जायला न मिळणं याचच फ़ार वाईट वाटतं...आणि आता कुणाशी तितकासा संपर्क नसल्यामुळे उरते फ़क्त मी एकटी.....
खुप कंटाळा येतोय आता मला या विरहामुळे आलेल्या माझ्याच मॅच्युरिटीचा.....अल्ल्ड व्हावसं वाटतयं....पुन्हा मित्र-मैत्रीणींसोबत हुंदडावस वाटतयं.....
माझं त्याच्या सोबतच पण वेगळ असही काही अस्तित्व आहे हे माझंच मला उमगलयं आता...तेच अस्तित्व मला जगावसं वाटतयं....
सखे तुलाही वाटतच असेल ना??????
वाटतयं का गं तुलाही....
कर्तव्यात अडकण्यापुर्वी...
मोकळे काही श्वास घ्यावासे....
पुन्हा फ़ुलपाखरु होऊन ....
अल्लड रंगात रंगावेसे...
वाटतयं ना....???
...सई
Thursday, July 2, 2009
पत्रास कारण की,
प्रिय,
कसा आहेस?सहजच वाटलं पत्र लिहावसं....आता म्हणशील रोज तर बोलतो फ़ोनवर मग मधेच पत्र लिहीण्याची लहर(सवड) कशी काय मिळाली बुआ....असो....रोज कितीही बोललो म्हणजे मला मान्य आहे हल्ली आपण पुर्वीसारखं बोलत नाही तरीही.....काही गोष्टी बोलुन सांगण्यापेक्षा मला वाटलं आज पत्रातुन व्यक्त व्हावं...त्यामुळे आता आश्चर्याचे भाव ओसरू द्यावेत अन थोडं नॉर्मल होऊन पत्र वाचवं....
तर पत्र लिहीण्यास कारण की,
आज तुम्ही बोलता बोलता एक प्रश्न विचारलात की,""सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"तेव्हाचा माझा चेहरा बघितला असतास ना तर तुलाही माझे ते भाव कळले नसते...असा का प्रश्न तुला पडावा रे?
Practically ह्या प्रश्नाच उत्तर द्यायचं म्हटलं ना तर मला सरळ वाटतं की,ह्या जगात कुणीही परिपुर्ण नसतो,तसच कुणाचाही जोडीदार हा त्याला १०० टक्के अनुरुप कसा मिळू शकतो,एकात जे कमी आहे ते दुसर्याने पुर्ण करायच असतं तरच ते नातं परिपुर्ण होऊ शकतं.माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा तु आहेस कधी कधी या गोष्टीचा आपल्या दोघांनाही त्रास होतो पण,माझ्यात जे नाही ते मला तुझ्यात सापडलं किंवा तुझ्यात जे नाही ते तु माझ्यात शोधतोस आणि आपलं नात फ़ुलवतोस परिपुर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे महत्वाच नाही का? आणि खरं सांगायच तर तुला कुणी परी जरी मिळाली आणि मला कुणी "परा" मिळाला ना तरी तिथही वाद,भांडणं होतच राहणार coz nobody is perfect.
मला कधी असा प्रश्नच पडला नाही कारण तुझं माझ्यावरच असलेलं प्रेम,तुझं मला समजुन घेणं...माझ्या चिडण्याला,माझ्या रागवण्याला bare करणं....jokes apart.....पण खरचं तुझ्यापेक्षा चांगला कुणी मला भेटला असता की नाही देव जाणे पण देवाने माझ्यासाठी उत्कृष्ट असा तुच पाठवला आहेस.(कारण माझी बडबड,चिडचिड तुझ्या व्यतिरिक्त कुणीच सहन करु शकत नाही.

)काळजी घ्यावी...नेहमीप्रमाणे खुप आठवण येतेय तुझी....लव्ह यु....
तुझ्या माझ्या नात्याला, नाही अंतराची बंधनं
नाही दुराव्याचे दुःख...नको स्पर्शाची आस...
नाही झाला संवाद जरी,तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "सय", जुळलीये आपल्यात,
म्हणुनच श्वासागणिक, येते तुझी आठवण....
अन करते मनात...तुझी तुझीच साठवण....
तुझीच वेडी,
सखी.
Monday, March 16, 2009
नव्याने गवसलेली सखी....
आज सकाळी ऊठायची ईच्छाच नव्हती सखीची. तशी ती रोज दीपच्या नंतरच ऑफ़िसला जाते. त्याच आवरुन दिलं की स्वतःची तयारी करते.
कालच पुण्याला जाऊन आल्यामुळे अंगातला प्रवासाचा शीण तिला जाणवतच होता.कसं असतं ना...मनसोक्त हिंडण्याची हौस असते, ती पुर्णही करतो आपण. पण थकल्याची जाणीव होते अंथरुणावर पडल्यावरच.तिचंही तसंच झालं.
एकटीच गेली होती काल पुण्याला कवितांच्या कार्यक्रमासाठी. त्याला मुंबईतच काही कामं असल्यामुळे तो येऊ शकला नव्हता.
सकाळी उठताना त्यानं एकदाच तिला विचारलं...."काय गं आज जायचं नाही का?"
"तु आवर मी उठतेच" असं म्हणुन ती पुन्हा झोपी गेली.
त्यानं स्वतःच आवरुन घेतलं. चहा बनवला,ब्रेड टोस्ट करुन खाल्ले.
पुन्हा निघताना तिला उठवलं म्हणाला...."अगं उठ ना. जा ऑफ़िसला".
ती उठली खरी, पण ऑफ़िसला जाऊन पुन्हा यांत्रिक होण्याचा तिचा काही एक मूड नव्हता.
ती "बरं.." म्हणुन उठली त्याला बाय केलं आणि ऑफ़िसला फ़ोन करुन "बरं नाहीये. मी आज आँफ़िसला येत नाही" अस कळवलं.
कधी नव्हे ते इतकी निवांत सकाळ तिला मिळाली होती. सकाळचं आवरुन मस्तपैकी चहा गरम केला. आज बर्याच दिवसातनं त्याच्या हातचा आयता चहा ती घेणार होती. चहा ब्रेड खात पेपर वाचला. घर आवरलं मस्तपैकी सी डी प्लेअर वर आवडीची गाणी लावुन घर आवरायला घेतलं. तेवढ्यात मोबाईलवर "मेरी दुनिया है तुझमे कही.." हे गाणं वाजल त्याच्या फ़ोनसाठी ठेवलेली खास ट्युन. फ़ोन उचलला. मागे वाजत असलेल्या आवडीच्या गाण्यावरुन त्यानं ओळखलं की आज ही गेलीच नाही ऑफ़िसला.
"काय राणीसरकार आज नाही गेलात...आम्हांला तरी सांगायचं आम्हीही दांडी मारुन राहीलो असतो तुम्हांला सोबत म्हणुन"
ती: "अहो साहेब ऑफ़िसात आहात ना?जरा तरी लाज धरा."
तो: "लाज का बायकोशीच बोलतोय मी. तेही स्वतःच्या" असं म्हणुन दोघहि हसायला लागली.
ती: "बाय द वे, तुला दांडी मारायला सांगुन तु थोडीच घरी राहणार होतास. आजच्या मिटींगसाठी म्हणुनच काल आला नाहीस माझ्या सोबत.."
तो: "बरं बरं. करा आराम चल ठेवतो बाय. लव यु"
ती: "लव यु. काळजी घे"
तिनं फ़ोन ठेवला. आंघोळ वैगेरे करुन स्वतःपुरत खायला बनवलं. थोडा वेळ टीव्ही बघितला. मग ऑनलाईन जाऊन कम्युनिटिवर थोड्याफ़ार कविता वाचल्या. स्वतःही एक कविता लिहुन त्याला मेल केली.
मन एक रानफ़ुल
एकटच डोलणारं
पडते त्याला भुल
मन मायेत झुलणारं...
मन वैशाख वणवा
कैफ़ाच्या काही क्षणी
मन वसंत हिरवा
बहरतो पानोपानी...
मन स्वप्नाचा गाव
दाटणारा नयनात
भाव ओघळतो कधी
अश्रुच्याही रुपात...
कविता वाचुन लगेच रिप्लाय मेल आला त्यानंही चारोळी लिहुन पाठवली.
मन नाजुक गं सये
अगदी तुझ्यासारखं
मना लागे तुझी ओढ
होते प्रेमास पारखं...
४ वाजता उठून चहा बनवला. चहा घेत घेत टिव्ही बघत बसली.
खुप फ़्रेश वाटत होतं तिला आज. खरच किती यांत्रिकपणा येतो जगण्यात रोज ऑफ़िसला जा कामाचे रगाडे उपसा. घरी येऊन घरही आवरा आणि जेवण बनवा आणि झोपुन जा. कंटाळा येतो अस "मोनोटोनस" होऊन जगण्याचा.
आज बर्याच दिवसांनी ती अशी दुपारी झोपली होती मनासारखी वागली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकली होती.
विचारातुन बाहेर आली तेही मोबाईलवर sms आल्यावर.
घरातला केर काढला तयारी केली अन बाजारात गेली.
भाज्या घेतल्या. त्याच्या आवडीची मेथीची भाजी घेतली. सुगंधी उदबत्त्यांचा पुडा आणि थोड्या मॉडर्न अशा छोट्या मेणबत्त्या घेतल्या. मोगर्याचे चार गजरे घेतले एक छोटासा चॉकलेट केक घेऊन घरी आली.
तसा तिला मेथीची भाजी खुडायचा जाम कंटाळा पण आज मुडच वेगळा होता. तिनं भाजी खुडली मस्तपैकी बनवली,चपात्या केल्या,भात डाळ लावला. थोड्या वेळाने डाळ फ़ोडणी घातली,पापड तळुन ठेवले ७.३० वाजत आले होते इतक्यात तो येईलच.
किचन आवरुन घेतलं. केर काढला. छान साडी नेसली. कधी नव्हे तो गजरा लावला. डायनिंग टेबलवर सगळ जेवणं नीट सजवुन ठेवलं आणि एका काचेच्या बाऊलमधे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. भरपुर उदबत्त्या लावल्या नेहमी एअर फ़्रेशनर ने सुगंधी होणारं घर आज उदबत्त्या आणि तिच्या केसातल्या गजर्यामुळे सुगंधी झालं होत. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या बाऊलमधे तिन एक मेणबत्ती तरंगत ठेवली आणि इतर मेणबत्त्या टेबलावर लावल्या.
दारावरची बेल वाजली अन तो आला. घरात झालेला अंधार बघुन तसा थोडा घाबरला. तितक्यात तिनं आवाज दिला, "आलास ना? थकला असशील. जा आवरुन घे जेवण तयार आहे".
घरातलं वातावरण बघुन, नाही.. अनुभवुन त्याला कळालं स्वारी आज काही तरी वेगळ्याच मुडमधे आहे ते. त्याला ह्या वातावरणाला खरं तर तिला फ़क्त अनुभवायच होत. काहीही न बोलता तो फ़्रेश झाला आणि जेवायला बसला तिने पानं घेतली.
व्यवस्थित जेवण वाढलं. तो तिच्याकडे फ़क्त बघत होता.
ती: "काय बघतयोस?"
तो: "काही नाही. आज काय विशेष आहे याचा विचार करतोय"
ती: "माझ्यासाठी तसं आहेच. सांगु?"
तो: "सांग ना राणी"
ती: "ईतके दिवस यांत्रिक झालेली मी, मला जुनीच पण नव्याने गवसलीये रे. खरंच यासाठीच आज हा महोत्सव".
त्यातं काही न बोलता तिला मिठित घेतलं आणि एखाद्या निरागस बाळाच्या कपाळावर ओठ टेकतात तसे तिच्या कपाळावर टेकले.
त्यानंतर दोघांनीही जेवुन घेतलं.
तो: "चल ना आईस्क्रिम खायला जाऊयात"
ती: "मज्जा! चल ना"
त्यानं खाली जाऊन पार्कींग मधली गाडी काढली. ती दोघंही गाडीत बसली. त्यानं तिच्या आवडीच "चांदण्यात फ़िरताना " हे गाणं लावलं. आज ती दोघंही मौनातुनच एकमेकांना अनुभवत होती.
जुहु ला नेऊन त्यानं गाडी थांबवली. बीचवर जाण्याआधी Naturals मधुन आईस्क्रिम घेतलं. गाडी पार्क करुन वाळुवर बसुन त्या दोघांनी ते संपवलं आणि मग हातात हात गुंफ़ुन चांदण्याचा सडा असलेल्या आकाशाकडे पाहत बसले शांत.तृप्त,निवांत.
तेवढ्यात सखीला कुणीतरी जोरात हलवले..."झोपेत हसतेस काय गालातल्या गालात? ऊठ....सकाळचे ९ वाजलेत."
आयला स्वप्न होतं तर हे असं स्वतःशी म्हणत लगेच फ़ोन करुन दीपला सांगितलं....आणि नेहमीप्रमाणे त्याने तिला अक्षरश: वेड्यात काढलं.
Wednesday, September 17, 2008
चिठ्ठी ना कोई संदेस...
१-२ तास मजेत ऑर्कुटींग झाल्यावर जेवायला गेले. इतक्यात पप्पांचे मित्र सरतापे यांचा फ़ोन आला. पप्पा जेवत होते. सो.. फ़ोन मी उचलला. "पप्पाना फ़ोन दे" इतकचं बोलले सरतापे. त्यांच्या आवाजात कसलसं टेंशन जाणवत होत. मी पप्पांना फ़ोन दिला. "अरे मी या शिवम हॉस्पिटलमधे आहे. शिंदेच्या मुलीला डॉक्टर अँडमिट करायचं म्हणतायत. तु जरा ये. तो घाबरल्यासारखा वाटतोय" असं काहिसं म्हणाले ते.
घाबरणारच ना! कुठलाही पुरुष जेव्हा बाप होतो, तोही मुलीचा तेव्हा तो पुरुष असला तरी हळवा बनतो आणि काळजी करतो, ती एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त भावनाप्रधान होऊन. पप्पांनी लगेच हात धुतला आणि तयारी करुन निघाले. मम्मीही गेली पप्पांसोबत.
शिंदेकाका हे आमचे फ़ँमिली फ़्रेंड होते. त्यांची मुलगी, स्नेहा ९ वी मधे शिकायला होती. त्यामुळे आम्हालाही तसं टेंशनच आलं होतं.आणि का कोण जाणे माझ्या मनाला विचित्र भिती वाटली.
थोड्या वेळाने मीही जाणारच होते. घाईघाईने घरातली कामं आटोपत होते तोच पप्पांचा फ़ोन आला, स्नेहा गेली म्हणुन.माझ्या मनाची भिती खरी ठरली. रडु आवरेनासंच झालं. ती एवढुशी स्नेहा डोळ्यासमोर आली. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळ्या आठवणी आठवल्या.काल-परवा डोळ्यासमोर असणारी व्यक्ती अशी अचानक गेली यावर विश्वासच बसेना.आणि हुंदकेही आवरेना.
कसं ना माणसाचं काहीच सांगता येत नाही कधी काय होईल ते. फ़क्त उलटी आणि तापाचं निमित्त झालं आणि स्नेहा हे जग कायमच सोडून गेली.
कुणी वारलं ओळखीतलं किंवा अनोळखी जरी...म्हणजे मरणाची बातमी मग ती कुणाचीही असो कशीही कानावर आली तरी का कुणास ठावुक लगेच माझ्या मनात विचार येतो की उद्या मीही अशीच चालता बोलता निघून गेले तर? कधी ना कधी मी मरणार तर आहेच. पण तरीही असा विचार येतो आणि खुप वेळ मी हाच विचार करत बसते.
मी मेले तर सगळ्यात जास्त कोण रडेल?
कोणाला सगळ्यात जास्त वाईट वाटेल?
तसं कुणाचं फ़ार काही अडेल असं नाहीये. पण तरीही माणसाचं मनंच असं, 'आपल्यावाचुन कुणाचं काहीच अडत नाही' हा विचारही किती त्रास देतो नाही का? माझंही तसंच. मीही एक सर्वसामान्यचं आहे ना.
आज तसंच काहीसं झालं.
"चिठ्ठी ना कोई संदेस...
जाने वो कोनसा देस,
जहाँ तुम चले गये..."
हे जगजीतचं गाणं ऎकताना विचार भरकटायला लागले. आधी फ़क्त एक गाणं म्हणुन ऎकल आणि मग जेव्हा मन लावुन ऎकल तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द घुसत गेला मनात.
न राहवुन मी सख्याला विचारलं 'तु हे गाणं ऎकलयसं का?' तर तो म्हणाला की 'हे गाणं तर मला पाठ आहे' आणि त्याने चक्क गायला सुरुवात केली. तसा त्याचा आवाज बराच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा तरी.
त्याने गायला सुरुवात केली आणि
" एक आह भरी होगी..
हमने ना सुनी होगी,
जाते जाते तुमने
आवाज तो दी होगी......"
हे ऐकताना खरंच अस वाटलं की मी मेलेयं आणि तो हे गाणं गातोय. नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तेव्हा मी काहीच न बोलता विषय लगेच बदलला. फ़ोन ठेवल्यावर मात्र मला खरंच असं वाटलं की,
मी उद्या मेले तर काय वाटेल याला?
तो लगेच विसरु शकेल का मला?
त्याला दुसरं कुणी आवडेल का माझ्याइतकं?
दुसर्या कुणावर तो माझ्यावर करतो तितकच प्रेम करेल का?
संध्याकाळी त्याने फोन केल्यावर तो काही बोलण्याच्या आतंच मी त्याला विचारलं, "उद्या मी मेले तर तु काय करशील?? " मी अचानक विचारलेल्या कुणाचाही गोंधळ उडवणार्या प्रश्नाने तोही गोंधळला असावा हे खरं.माझ्या इतर खुळचट प्रश्नाइतकाच हा प्रश्नही त्याला खुळचटच वाटला असावा.
तो म्हणाला, "हे काय बरळते आहे काहिही".
पण मी त्याचं वाक्य मध्येच तोडून त्याला विचारलं, "सांग ना रे? काय करशील?
"त्याने एक बराच मोठा पॉझ घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या गाण्यामुळेच मी असं काहीसं विचारतेय ते. एक मोठा उसासा टाकत तो म्हटला, "तु गेल्यावर त्यानंतरचा प्रत्येक दिवस जगायचा म्हणून जगेन मी. सतत हाच विचार करेन की लवकर हे आयुष्य आटपुया आणि सईकडे जाउया ती तिथं माझ्याविना एकटी़च असेल."
म्हणजे इनशॉर्ट, तोही हेच म्हणाला की तु गेल्यावर तसं काही अडणार नाही माझं.... जगेन मी..... फक्त तुझ्या सहवासामुळे लागलेल्या सवयी त्रास देतील. तुझी खुप आठवण येईल. ज्या ज्या वेळेला आपण बोलायचो फोनवर ती वेळ फार छळेल मला तु गेल्यावर. तुझ्या कवितेतून तुझ्या शब्दातून आठवत बसेन तुला.
माझीही अपेक्षा नव्हतीच की त्यानं रडावं, मी गेल्यावर सगळं सोडून देवदास व्हावं अशी. त्यानं खरंच खुप Practical उत्तर दिलं आणि तेच बरोबर होतं. कारण कुणा एका व्यक्तीमुळे आपण हे आपलं आयुष्य जगतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे कुणी गेल्यावर सगळं संपल असही होत नाही. फक्त त्या व्यक्तीची कमतरता मात्र जाणवते आणि जाणवावीच खर तर.आपण माणुस आहोत आणि खरं म्हणजे आपल्याला मन नावाची गोष्ट देवाने देऊ केलीये हे यावरून कळतं.नाहीतर माणुस आणि जनावर यात फरक तो काय.
म्हणुनच माझी एक माफक आणि छोटीशी अपेक्षा आहे की, मी गेल्यावर माझ्या जवळच्या माणसांनी मी गेल्याच्या दुःखात सगळं सोडून फक्त माझीच आठवण काढत रडत बसावं असं नाही... तर फक्त कुठेतरी, कधीतरी मला, माझ्या आठवणींना, माझ्यासोबत घालवलेल्या चार-दोन क्षणांना आठवावं... एवढचं....
" मेरे जाने पर,
याद ना करना हर वक्त मुझको
पर तुम मुझे भुला न देना
यही ख्वाहीश है मेरी,
जब भी याद आये कुछ पल साथ गुजारे
तब दो आसुही बहा देना"
......सई(सुप्रिया पाटील)
Saturday, September 6, 2008
पाऊस,एफ़.एम आणि सखा
नेहमीप्रमाणे बसची वाट बघण्यास सज्ज झाले. आता सज्ज झाले वगैरे हे असं ,का असा प्रश्न पडला असेल ना? कारण बसची वाट बघण्यातच अर्धा जीव जातो इथं. बस यायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल असं गॄहीत धरून मी बेस्ट वाल्यांना ४ शिव्याही घालून घेतल्या. मग टाईमपास व्हावा यासाठी एफ.एम लावायचा विचार करतेय तोच कधी नव्हे ती माझी बस चक्क ५ मिनीटात आली.पुन्हा पुन्हा पाहीलं तर खरच २२४- शांतीआश्रम हीच बस होती.
नेहमीप्रमाणे गर्दी होतीच बसमध्ये चढताना. कशीतरी धडपडत बस मध्ये चढले.बसायला जागाही मिळाली. आता जवळपास १ तास फुरसत होती घरी पोचायला. एफ.एम लावला खरा पण window seat नसल्यामूळे गाणी नीट ऎकू येत नव्हती म्हणून mp3 लावून संदीप खरेचं अग्गोबाई ढग्गोबाई non stop १०-१५ वेळा ऎकलं.थोड्याच वेळात window seat मिळाली.
एफ एम लावला आणि कुठल्यातरी स्टेशनवर चांगल गाणं लागेल हे शोधत होते तोच ९८.३-रेडिओ मिरची वर राहत फतेह अली खानने गायलेलं "लागी तुमसे मन की लगन....लगन लागी तुमसे मन की लगन" हे one of my favouirate गाणं लागलं. पुर्णतः मग्न होऊन ते गाणं ऎकलं. तोवर मी म्हणजेच बसने अर्धा रस्ता पार केला होता. एक एक भाव अनुभवला गाण्यातला. गाणं संपल्यावर स्टेशन चेंज केलं तोच रेडीओ सिटी वरही तेच गाणं. ह्या एफ एम वाल्यांच हे नेहमी अनुभवलयं मी. एका स्टेशन वर एखादं गाणं वाजलं ना की थोड्या वेळाने तेच गाणं दुसरया कुठल्यातरी स्टेशनवर वाजतच....असो.
हा असा गाण्यांचा सिलसिला सुरू होता त्यात "मै टल्ली हो गयी" सारखी गाणीही वाजलीच.
पण आज सगळी slow rythem असलेली गाणी ऎकायचा मूड होता. याला कारणही तसंच valid होतं. आज "त्याची" म्हणजेच "सख्याची" खूप आठवण येत होती. अभ्यासाच्या tension मूळे गेले काही दिवस त्याच्याशी नीट बोलताच आलं नव्हत म्हणूनच असेल कदाचित !गाणी ऎकण्याच्या आणि त्याला आठवण्याच्या सिलसिल्यात एक तास इतक्यात निघून गेला.
आज कानाला एफ एम लावुनच बस मधून उतरायचं अस ठरवलं. मोबाईल ठेवला पर्समध्ये आणि हेडसेट तसाच कानाला ठेवून उतरले खाली. का कोण जाणे, पण आज मूड होता तसाच. मध्येच खरखर आली signal नसल्यामुळे. पण उतरल्यावर मात्र आवाज अगदी clear.....
बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला तेवढ्यात. माझ्याकडे नेहमीप्रमाणे छत्री तर नव्हतीच. आणि का ठेवावी छत्री? पाऊस गेले काही दिवस कुठंतरी दडी मारून बसलेला असा अचानक येईल हे थोडीच माहीत होतं मला? आणि असंही मला छत्री न्यायचा नेहमीच कंटाळा येतो आणि बरच झालं पाऊस येत होता. भिजायचा मुड होताच माझा.
त्या रिमझिम पावसात चालत होते आणि तेवढ्यात गाणं लागलं.....
"रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम
भिगी भिगी ऋत मे
हम-तुम हम-तुम चलते है...चलते है.... "
गाणं ऐकताना वाटलं काय situation ला लागलंय गाणं. आणि मी चक्क गाण्यात. हरवले तेही अशी की आजूबाजूला सगळीकडे शांतता आणि पावसात चालणारे "मी" आणि "सखा"(तो) असं imaagine केलं. पण नंतर स्वतःलाच खुळं ठरवत स्वप्नातून बाहेर आले कारण ईथं पाउस होता. रिमझिम-रुमझुम ऋतू पण भिजलेला होता. त्यात चालणारी "हम" म्हणजेच "मी" तर .होते पण माझ्याबरोबर असायला हवा असणारा "तुम" म्हणजेच "सखा" नव्हताच मुळी आत्ता सोबतीला. तो तिथं सातासमुद्रापार, गाढ नाही म्हणता येणार पण साखर झोपेत होता. कारण तेव्हा माझ्याकडे संध्याकाळचे ४.३० आणि त्याच्याकडे सकाळचे ७ वाजले होते.
त्याच्या विचारात घर केव्हा आलं कळलं नाही आणि तोवर गाणंही संपलं होतं. पण दिवसभराचा असलेला थकवा माझ्या चेहरयावर आता मात्र नव्हता तर स्वतःच्याच वेडेपणावरचं छोटंस हसू मात्र होत.
पण आवडलं असतं खरंच मला खुप त्याच्याबरोबर पावसात फिरायला. म्हणजे कसं माहीतेय, त्या गाण्याप्रमाणेच एखादी बाग... शांत आणि नीरव. तिथंच मी आणि तो, रिमझिम पडणारया पावसात भिजणारे,खुप मज्जा करणारे आणि मनसोक्त भिजून झाल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा घेणारे.
पण कसलं काय? असली नुसती स्वप्नच बघायची आम्ही.तो येईल आता पुढल्या उन्हाळ्यात आणि लगेच १५ दिवसांनी जाईलही. त्यामुळे असा योग कधी येईल कोण जाणे? त्यामुळे मला सध्यातरी या स्वप्नावरच धन्यता मानावी लागणार आहे.....
"कधी रे असं होईल?
येणारया पावसात
ओलेत्या दिवसात
आपली भेट होईल... ".
.......सई(सुप्रिया पाटील)
Monday, May 12, 2008
...विचार...
विचार..... बाई गं...कधीच पाठ सोडत नाहीत कोणाची...
कसला ना कसला विचार चालुच असतो प्रत्येकाच्या मनात....कोणी अभ्यासचा विचार करतं... तर कुणी नोकरीचा....कुणी मुलाबाळांचा तर कुणी बायकोचा......कुणी फ़क्त स्वताचा ,तर कुणी निःस्वार्थी होउन फ़क्त दुसर्यांचा..आणि एखाद्याला विचार करायला काहीच विषय नसेल तर दुसरं कुणी कसला विचार करतयं याचाचं विचार पडलेला असतो.... विचार करायला विषय कधी कमी पडलेच नाहीत माणसाला.... शांतता तर अजिबात नाही मनाची....नेहमी आपली गर्दी विचारांची....ही विचारांची शृंखला कधी थांबायचं नावचं घेत नाही मुळी.....नुसता आपला कसला ना कसला विचार....कंटाळा येतो बाई विचारांचा...सोडा ना कधीतरी शांत,निवांत...पण नाही.... असं कधी होतचं नाही...
म्हणतात बुआ....ही विचारांची शॄंखला म्हणे झोपल्यावर थांबते...खरचं का????
मला नाही वाटत असं.....
झोपतं ते फ़क्त शरीर....विचार तर छळतातचं की मनाला....स्वप्नांच्या रुपात....हो ना??????
..........सई(सुप्रिया पाटील)