Showing posts with label ...मन.... Show all posts
Showing posts with label ...मन.... Show all posts

Wednesday, April 18, 2012

"मुक्त"

रंगवणारा तो,
कुठलीही रंग"संगती" घडवतो.

हे रंग एकमेकांना भेटल्यावर,
स्वतःचे अस्तित्व बदलून
"स्व" संपूर्ण नष्ट होऊन
तयार होतो नवा "रंग"

वदतो तो बरंच काही...
पण सारकाही मौनात व्यक्त,
उरतात मागे,
काही आलेख...
काही खुणा...
आणि काही अवशेष फक्त....
ह्याच निःशब्दाची सीमा ओलांडून,
सुनसान वस्तीत वसलेल्या...
आवाजाचे पृथ्थकरण झाल्यावर,
उरतो एक वेगळाच "मंत्र"

त्याच्या ह्या अफाट संसारातलं,
माझ हे इवलंस अस्तित्व,
त्याने निर्मिलेल्या,
"त्या"वेगळ्या "रंगा"त,
रंगू पहातंय...
त्याने निर्मिलेला तो "मंत्र "
एकदा उच्चारून,
मुक्त होऊ पहातंय....
"माझं"
हे अस्तित्व
जे त्याचाच एक अंश आहे...

..सई

Sunday, April 8, 2012

"सावल्या"



धूसर होत चाललेल्या,
काही ओळखीच्या
काही अनोळखी...

कधी तृप्त
कधी अधाशी...

"सावल्या"

सांजेच्या कुशीतून
रातीच्या डोहात
शिरताना,
त्याही गुडूप झाल्या...
:
काळ्या कुट्ट
अंधाराच्या मिठीत
विरघळलंय आता अस्तित्व
:
पण त्या सावल्यांच्या
करड्या छटा...
त्यांच काय...?

ज्यांचा मन अजूनही घेतंय...
मागोवा...

...सई

Wednesday, December 14, 2011

..मन..

काय असे ह्याचे रुप
असे कसा याचा रंग
माझ्या मनाचा कसा
सांगा ओळखावा ढंग?

मन अल्लड पाखरु
कधी नभात विहार
स्वैर बागडते कधी
साता सागराच्या पार..

मन फ़क्त शब्द शब्द
वाटे जगास कविता
भासे खळाळ खळाळ
जशी वाहते सरिता..

मन मल्हार होऊन
सुरातून बरसतं
कधी तरल अधीर
शब्दातून झिरपत..

मनी दाटते आभाळ
मन होतं नभापरी
कोसळते सांजवेळी
जसा ऋतु पावसाळी..

मन परके परके
कधी जगापसुन होते
मन पाचोळा हलके
आकाशात तरंगते..

मन गुंत्यात गुंतते
वेड्या मायेच्या आकाशी
होऊन शिकार मायेचे
होते एक बंदिस्त पक्षी...

असं कसं मन माझं
माझं मला समजेना...
एक कोडं वाटे मन
त्याच गुज उमजेना...

....सई(सुप्रिया पाटील)

Saturday, March 14, 2009

शोध मनाचा...

मन का?...
अगाध कोडं आहे मन
कधीही न उलगडणारं...
असुनही प्रत्येकाकडे
कधीही न सापडणारं..
मन असं मन तसं
असच मानत रहायचं...
पण नक्की मन कुणासारखं,
असत कुठं लपलेलं...
हे गुढ सतत उलगडत बसायचं...
मनाचा गुंता मनानेच सोडवायचा
त्याच गुंत्यात मनाला गुंतवायचं...
मनाच्या शोधात मनाशीच भांडायचं
मनावरच उगा रुसुन बसायच...
भाडलं काय नि रुसलं काय?
मन थोडीच कळलयं कुणाला....
नाही सापडणार शोधुन हे
थोडीच वळलयं कुणाला...
तरिही घेतोच आपण
शोध मनाचा....कधीही न संपणारा....

...सई(सुप्रिया पाटील)