Wednesday, July 23, 2008

विरहाचं लेणं...

तुझ्या विरहाचं लेणं
माझ्या डोळ्यात
नेहमीच अश्रुरुपात असतं
तुझ्या डोळ्यातलं आभाळ मात्र
नेहमी कसं कोरडसं असतं
मला मोकळं झाल्याशिवाय
चैनच पडत नाही...
तुला कसं अस सगळं
मनात ठेवणं जमत???

....सई(सुप्रिया पाटील)

तु सोबत असताना....

भांडते आकाशाशी...
तुझ्या आठवांशी भांडताना...
नाही ना रे जमत ते
तु सोबत असताना...
:
:
तु सोबत असताना,
वेडं मन कधी दुःखाने
भरुनच येत नाही...
म्हणुनच तुझ्यासोबत असताना
रडावसं वाटत नाही..
डोळ्यात पाणी आलं तरी आनंदानं येतं..
पण हसण्या हसण्यात ते पाणी,
डोळ्यातच विरुन जातं...
मग सांग कशी रडू तु सोबत असताना???

....सई(सुप्रिया पाटील)

मनाचं आभाळ...

तू जवळ नसताना नेहमीच
मनाचं आभाळ भरुन येतं...
डोळ्यातुन आसवांवाटे
तेही मग कोसळून जातं...
मोकळ्या झालेल्या
त्या स्वच्छ आभाळी
तुला चांदणी दिसते...
तुला मात्र ती
माझ्यासारखी भासते...

...सई(सुप्रिया पाटील)

Thursday, July 17, 2008

तुझी स्वप्नं...

वार्‍यावर लहरते मी...
अंबर कवेत घेते मी...
स्वप्नांना त्या
मोरपिसापरि जपते मी..
झुळझुळणार्‍या नदी-खळ्यातुन
ओघळणार्‍या दव-थेंबातुन
डुलणार्‍या रानफ़ुलातुन
चमचमणार्‍या चांदतार्यातुन
पावसाच्या प्रत्येक सरीतुन
गोंडस फ़ुलाच्या गंधातुन
कणाकणातुन-मनामनातुन
तुझी स्वप्न जपते रे...
तुझ्या स्वप्नांशि बोलते रे..
तुझी स्वप्न जागते रे....
तुझी स्वप्न जगते रे....

...सई(सुप्रिया पाटील)