Wednesday, December 14, 2011

..मन..

काय असे ह्याचे रुप
असे कसा याचा रंग
माझ्या मनाचा कसा
सांगा ओळखावा ढंग?

मन अल्लड पाखरु
कधी नभात विहार
स्वैर बागडते कधी
साता सागराच्या पार..

मन फ़क्त शब्द शब्द
वाटे जगास कविता
भासे खळाळ खळाळ
जशी वाहते सरिता..

मन मल्हार होऊन
सुरातून बरसतं
कधी तरल अधीर
शब्दातून झिरपत..

मनी दाटते आभाळ
मन होतं नभापरी
कोसळते सांजवेळी
जसा ऋतु पावसाळी..

मन परके परके
कधी जगापसुन होते
मन पाचोळा हलके
आकाशात तरंगते..

मन गुंत्यात गुंतते
वेड्या मायेच्या आकाशी
होऊन शिकार मायेचे
होते एक बंदिस्त पक्षी...

असं कसं मन माझं
माझं मला समजेना...
एक कोडं वाटे मन
त्याच गुज उमजेना...

....सई(सुप्रिया पाटील)

No comments: