Thursday, September 29, 2011

पुन्हा नव्याने ...

चालता चालता अचानक
रोजच दिसणार्‍या ....पण अचानक वेगळ्या भासणार्‍या
बर्‍याच गोष्टी डोळ्यासमोरून जातात...
तोच तो रस्ता....तीच वळणे
रोजचच असलेलं सारं
पण अचानक जाणवू लागतात कितीतरी बदल...
बदल होतच असतात खरतर...
आपलं लक्ष नसत गेलेलं इतकच....
:
:
एखाद्या अशाच ओळखीच्या वळणावर,
थांबून थोडा विचार करावा कधीतरी
त्या वळणाशी जोडलेल्या आठवणींना
पुन्हा उजाळा द्यावा....
नाही...नाही .....
उलट पुन्हा त्याच क्षणात जाऊन
त्यांच्यातच स्वतःला गुरफटुन....
त्यात थोडासा बदल करून...
मुठीत बंद करून टाकावेत असे काही क्षण...
असाच खोल काहीतरी वाटत कधीतरी...
अशीच उलटुन गेलेली आयुष्याची कित्येक पाने
पुन्हा उलटून.....
तेच क्षण जगु वाटतात पुन्हा नव्याने...

..सई

Wednesday, August 10, 2011

तुझ माझ नातं...

तुझ माझ नातं कसं...
किनारा आणि लाटेसारखं आहे...
तू अगदीच लाटेसारखा..
मनात येईल तसा वागणारा...
कधी शांत...क्लांत युद्धासारखा
कधी खवळलेला...पेटल्या वणव्यासारखा....
आवेग व्यक्त करतोस...तेव्हा,
अगदीच उधाणालेला...
तर कधी मायेने मला,
कुशीत सामावून घेणारा...
एकदम संथपणे ....

आणि मी किनारा....
तू कसाही येत असलास तरी...
तुझ्या भेटीच्या,
मिठिच्या ओढीने,
तिथेच थांबलेली....
तुला बिलगायला आतुरलेली....

..सई

Monday, August 1, 2011

"अंतरे"

तुझ्या माझ्यातही आता...
कधीही न संपवता येणार अंतरच निर्माण झालाय...
मी सतत प्रयत्न करते ते अंतर कमी करण्याचा...
धावत राहते उगाचच तुझ्या आठवणींच्या मागे...
दुसरा पर्याय आहे का रे आता,
आठवणीं शिवाय?....तुलाही अन् मलाही...
पण नाहीच पोहचत तुझ्यापर्यन्त....
फसवीच खरी अंतरे....
:
:
:
पण,
"अंत" झाला आपला तरी.....
आपल्या दोघांच्याही "अंत:करणात" कधी...
"अंतरे" निर्माण होतील का?

...सई

Wednesday, July 13, 2011

पाऊस आणि आठवण...

पावसाळी

चिंब मन

ओलसर

आठवण...


मनातल्या

आभाळात

दाटलेली

आठवण...


आसवांची

वाट होते

बरसते

आठवण...


विरहात

आस देते

जलधार

आठवण...


चिंब ओल्या

चाँदराती

विझलेली

आठवण...

...सई

Tuesday, June 7, 2011

"सोनमोहर"

संध्याकाळी बाहेर पडल्यावर,
रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेला "सोनमोहर" नजरेत आला,
संपुर्ण सोनेरी झालेलं ते झाड...
अन खाली रस्त्यावर पडलेला त्याच्या पिवळाधम्मक सडा.....
चैत्रात असच होतं त्याच...दरवर्षीच....
पण यावर्षी बघितल्यावर तुच आठवलास....
चैत्रात फ़ुलणार्‍या सोनमोहरासोबत तुही ह्यावेळेस फ़ुलला होतास.....
मावळतीच्या उन्हात जसा तो अजुनच तेजाळलेला वाटतो...
तसा तुही आता वाटतोस...
त्याचा येणारा उबदार गंध तुझ्या श्वासांची आठवण देत होता....
पुर्वी अगदीच कोमेजला होतास...
अगदीच रखरखीत झाला होतास....
जसा सगळा बहर ओसरून गेलेला सोनमोहर...
तुझ्या तशा असण्याची आठवणही नकोशी होते.....
तस तुला ऊन आवडत नाहीच.....
सोनमोहरही नसेल आवडत....
पण मला मात्र तु हल्ली त्या सोनमोहरासारखाच भासतोस.....
प्रफ़ुल्लीत....
गंधाळलेला...
उबदार....

....सई

Thursday, February 24, 2011

"आठवण"

आजुबाजुला सारचं....
शांततेत ...अगदीच निस्तब्ध असताना.....
मनही नि:शब्द होऊन जातं....
बरच काही बोलायला असुनही,
काहीच सुचत नसल्यासारखं.....
यालाही कारण तूच आहेस....
तुझ्या आठवणीच याला जबाबदार....
ढगाळलेलं आकाश....
पावसाची सततची लागलेली रिघरिघ....
बाहेर दिसणारा काळोख....
अशावेळी.....अशावेळी,
खिडकीच्या थंड झालेल्या गजांनाही,
स्पर्श करावासा वाटत नाही.....
कारण,
तुझ्या आठवणींच्या जगात हरवलेल्या मला
त्या स्पर्शानं दचकुन जाग येईल याची भितीच वाटते....
तुझ्या आठवणींना कवटाळुन झोपी जावं
अन त्याच्यांच कुशीत जागही यावी ...
तु जवळ नसताना आठवणींचीच ऊब घ्यावी....

....सई

Monday, October 4, 2010

तुजवाचुन जन्मच अडतो.

प्रिय सख्या,

तुझ्यात इतकं कधी गुंतले हे कळलचं नाही रे! माझ्यासारखी चंचल,अल्लड,चिडचिड करणारी,नको तेवढीpractical,straight forward व्यक्ती कुणावर इतकं प्रेम कशी करु शकते हाच विचार येतो हल्ली मला.

खरंच प्रेमात पडल्यावर माणूस संपुर्ण बदलतो याचा मला नव्यानं साक्षात्कार होतोय,म्हणजे तीन वर्षापुर्वी तुझ्याप्रेमात नुकतेच पडलेली मी आणि आजची मी यात जमिन-अस्मानाचा फ़रक जाणवतोय.

जशी मैत्री दिवसेंदिवस मुरते तस्सच आपलं प्रेम दिवसेंदिवस मुरतयं. प्रत्येक दिवशी प्रेमाची नवी छटाजाणवतेयं,नवा अर्थ कळतोयं.असं म्हणतात(प्रेम कधीच केलेले लोक) की काही दिवसांनी कंटाळा येतो तेच तेचगोड-गोड बोलण्याचा,भांडण्याचा.पण मला वाटत की जितकं जास्त आपण समोरच्या व्यक्तीला जाणतो ओळखतोतितकच त्या व्यक्तीबद्दलच प्रेम ओढ जास्त प्रमाणात वाटते.

आपण दोघं एकमेकांपासुन इतके दूर राहूनही एकमेकांबद्दलची सय अगदी तशीच पुर्वीसारखीच. खरतर पुर्वीपेक्षाहीजास्त वाढलीये.


तुझ्या माझ्या नात्याला,
नाही अंतराची बंधनं,
नाही दुराव्याचे दुःख,
नको स्पर्शाची आस.
नाही झाला संवाद जरी,
तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत
अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "
सय"
जुळलीये आपल्यात
म्हणुनच श्वासागणिक,
येते तुझी आठवण....
अन करते मनात
तुझी तुझीच साठवण....


तु विचार करत असशील आज इतकं सगळं सांगाय्ची गरज का वाटली हिला?आला ना हा प्रश्न मनात??

खरतरं मी इतकी बडबड करते,सगळ्या लहानातल्या लहान गोष्टी तुला सांगते कधी कधी फ़टकळपणे तुला काहीहीबोलते.पण मनापासुन मनातलं असं मनमोकळेपणाने बोलतच नाही.

आजही नेहमीप्रमाणे मी चिडचिड केली आणि तुझ्या "माझ्याशिवाय जगु शकशील का?" या प्रश्नावर अगदीखडुससारखं "हो" अस उत्तर दिलं.

पण खरं सांगु का मनात खड्डाच पडला होता.आताही विचार करुनही कसंसच होतयं.

मी इतके practical पणाचे उपदेश देते की कुणाचं कुणावाचुन काही अडत नाही. सगळंव्यवस्थित चालतं, वगैरे...पण तुझ्याशिवाय मी हा विचार जरी केला तरी इतकं काही भांबावुनजायला होतं की बास.

तु भारतातुन परत अमेरिकेला जाताना २४ तास माझ्याशी बोलला नाहीस तेव्हाही असच झालं होत.खुप काहीतरीचुकतयं असं!


खरचं,

श्वासही अडखळतो

जीव सतत तुटतो

सख्या रे,

तुजवाचुन जन्मच अडतो !



तुझीच,

सई